निर्भयाचा गुन्हेगार रविवारी सुटणार

By admin | Published: December 19, 2015 04:01 AM2015-12-19T04:01:12+5:302015-12-19T04:01:12+5:30

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडातील बालगुन्हेगाराचा रविवारी तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या

Nirbhaya criminals will be on Sunday | निर्भयाचा गुन्हेगार रविवारी सुटणार

निर्भयाचा गुन्हेगार रविवारी सुटणार

Next

नवी दिल्ली : संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडातील बालगुन्हेगाराचा रविवारी तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश जी. रोहिणी आणि न्या. जयंत नाथ यांच्या पीठाने या प्रकरणी हस्तक्षेपास नकार देताना कायद्यातील विद्यमान तरतुदींअंतर्गत या अल्पवयीन गुन्हेगाराच्या सुटकेवर बंदी घालता येणार नाही, असे शुक्रवारी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयानेही स्थगिती दिली नाही, तर आता २० वर्षांचा झालेला हा आरोपी २० डिसेंबरला तीन वर्षांची शिक्षा भोगून बाल सुधारगृहातून बाहेर पडेल.

१६ डिसेंबर २०१२ रोजी राजधानी दिल्लीत २३वर्षीय निर्भयावर सामूहिक बलात्काराच्या घटनेतील आरोपीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याने त्याची गणना कायद्यातील व्याख्येनुसार ‘बालगुन्हेगारा’त झाली होती. दरम्यानच्या काळात याच घटनेतून बोध घेऊन १८ नव्हे, तर १६ वर्षांच्या खालील आरोपीसच बालगुन्हेगार संबोधण्याची दुरुस्ती केंद्र सरकारने प्रस्तावित केली. पण ती अजून राज्यसभेत संमत झालेली नाही. या पार्श्वभूमीवर कायद्यातील तरतुदींमुळे भाजपाचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांची या बालगुन्हेगाराच्या सुटकेवर बंदी आणण्याची विनंती मान्य करता येणार नाही, असा निर्वाळा पीठाने दिला. न्यायाधीशांनी सांगितले की, बालगुन्हेगार न्याय कायद्याअंतर्गत बालगुन्हेगारास जास्तीतजास्त तीन वर्षे सुधारगृहात ठेवता येते आणि या प्रकरणातील गुन्हेगाराचा हा कालावधी रविवारी संपतो आहे. त्यामुळे त्यानंतर त्याला बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश देता येणार नाहीत.

या प्रकरणातील इतर चार आरोपींना सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम ठेवली होती. एकूण सहा गुन्हेगारांपैकी एकाचा तिहार कारागृहात मृत्यू झाला. चार आरोपींनी फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात केलेली याचिका प्रलंबित आहे.

गुन्हा जिंकला आम्ही हरलो- पीडित निर्भयाच्या आईचा आक्रोश
उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने पीडित दिवंगत निर्भयाचे आप्तजन दु:खी झाले आहेत. अखेर गुन्ह्याचा विजय झाला आणि आम्ही हरलो, अशी खंत पीडितेची आई आशादेवी यांनी व्यक्त केली.
त्या म्हणाल्या, तीन वर्षांच्या सर्वतोपरी प्रयत्नांनंतरही आमचे सरकार आणि न्यायालयाने एका गुन्हेगाराची मुक्तता केली आहे. आम्हाला न्याय मिळेल अशी ग्वाही देण्यात आली होती परंतु ती फोल ठरली. त्यामुळे आम्ही अत्याधिक निराश झालो आहोत. निर्भयाच्या वडिलांनीसुद्धा या आदेशावर नाराजी जाहीर करताना आरोपीला धडा शिकवायला हवा होता, असे मत व्यक्त केले. तूर्तास या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा विचार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
माझ्या मुलीचे नाव ज्योती सिंग होते आणि ते जाहीर करण्यास मला कुठलीही लाज वाटत नाही. तुम्हीसुद्धा तिला खऱ्या नावानेच संबोधले पाहिजे, असे आवाहन आशादेवी यांनी केले.

Web Title: Nirbhaya criminals will be on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.