"ममता बॅनर्जींचा लक्ष हटवण्याचा प्रयत्न, राजीनामा द्यावा"; निर्भयाच्या आईची संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 07:13 PM2024-08-17T19:13:12+5:302024-08-17T19:15:27+5:30

कोलकाता येथील क्रूर बलात्कार आणि हत्या प्रकरणावर दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणातील पीडितेच्या आईने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे

Nirbhaya mother reacted angrily to the brutal rape and murder case in Kolkata | "ममता बॅनर्जींचा लक्ष हटवण्याचा प्रयत्न, राजीनामा द्यावा"; निर्भयाच्या आईची संतप्त प्रतिक्रिया

"ममता बॅनर्जींचा लक्ष हटवण्याचा प्रयत्न, राजीनामा द्यावा"; निर्भयाच्या आईची संतप्त प्रतिक्रिया

RG Kar Doctor Murder Case : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे देशभरातील लोक संतापले आहेत. या भीषण घटनेमुळे देशभरातील डॉक्टर्स संतप्त झाले असून ते संपावर आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देखील रस्त्यावर उतरल्या आहेत. आरोपीवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी ममता बॅनर्जी यांनी आंदोलन केलं आहे. अशातच या क्रूर बलात्कार आणि हत्या प्रकरणावर दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणातील पीडितेच्या आईने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित निर्भयाच्या आईने कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज प्रकरणावर मोठे वक्तव्य केले आहे.  महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून खून केल्याच्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा द्यावा, असेही त्यांनी म्हटलं आहे. ममता बॅनर्जी या आपल्या पदाचा गैरवापर करत आहे आणि घटनेतील दोषींवर कारवाई करण्याऐवजी या मुद्द्यावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप निर्भयाच्या आईने केला. अत्याचार करणाऱ्यांना तात्काळ शिक्षा देण्याबाबत केंद्र आणि राज्य सरकार गंभीर होत नाही, तोपर्यंत देशाच्या विविध भागांतून अशा रानटी घटना घडत राहतील, असेही त्यांनी म्हटलं.

पश्चिम बंगालमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा विरोधात देशभरात निदर्शने होत आहेत. निर्भयाची आई आशा देवी यांनी शनिवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्या परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचे म्हटलं आहे. जेव्हा कोलकात्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये मुली सुरक्षित नाहीत आणि त्यांच्यासोबत रानटी घटना घडतात, तेव्हा देशात महिलांच्या सुरक्षेची काय स्थिती आहे, हे समजू शकते. ममता बॅनर्जी या राज्य सरकारच्या प्रमुख आहेत. माणुसकीला लाजवेल अशी घटना त्यांच्या राज्यात घडते, ज्यामध्ये पोलिसांचा निष्काळजीपणा समोर येतो, त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले. ममता यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. दोषींवर कारवाई करण्यासाठी आपली शक्ती वापरण्याऐवजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आंदोलने करून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे आशा देवी यांनी म्हटलं.

दंगलखोरांच्या जमावाने रुग्णालयाच्या आवारात घुसखोरी करणे, घटनेशी संबंधित पुरावे नष्ट करणे आणि आंदोलक डॉक्टरांवर हल्ला करणे हे लज्जास्पद असल्याचेही निर्भयाच्या आईने म्हटलं आहे. २०१२ मध्ये देशाची राजधानी दिल्लीत निर्भयावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या विरोधात देशभरात तीव्र निदर्शने झाली. लोकांचा रोष पाहून सरकारला महिला सुरक्षेबाबत कडक कायदे करावे लागले होते.
 

Web Title: Nirbhaya mother reacted angrily to the brutal rape and murder case in Kolkata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.