‘निर्भया’च्या खुन्यांना आता ३ मार्च रोजी होणार फाशी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 06:09 AM2020-02-18T06:09:34+5:302020-02-18T06:09:54+5:30
न्यायालयाने काढले चौघांचे ‘डेथ वॉरन्ट’
नवी दिल्ली : ‘निर्भया’ बलात्कार व खून खटल्यात मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या चारही खुन्यांना फाशी देण्यासाठी येथील सत्र न्यायालयाने सोमवारी ३ मार्च ही नवी तारीख निश्चित केली. त्यानुसार मुकेश कुमार सिंग, पवन गुप्ता, विनय कुमार शर्मा व अक्षय कुमार यांना ३ मार्च रोजी सकाळी ६ वाजता दिल्लीच्या तिहार कारागृहात फासावर लटकविले जाईल.
याआधी २२ जानेवारी व १ फेब्बुवारी या तारखा ठरल्या होत्या. परंतु कायदेशीर गुंत्यामुळे तेव्हा फाशी दिली गेली नव्हती. फाशीची नवी तारीख ठरविण्यासाठी ‘निर्भया’च्या पालकांनी व दिल्ली प्रशासनाने अर्ज केले होते. ते मंजूर करून अतिरिक्त सत्र न्यायाधीश धमेंद्र राणा यांनी चौघांविरुद्ध नव्याने ‘डेथ वॉरन्ट’ जारी केली. याआधीच्या सुनावणीत खुनी विनयच्या वकिलाने आरोप केला की, विनयवर तुरुंगात हल्ला करण्यात आला. त्यात त्याच्या डोक्याला इजा झाली. शिवाय त्याचे मानसिक संतुलन ठीक नसताना त्याला फाशी दिली जाऊ शकत नाही. याखेरीज पवनला सर्वोच्च न्यायालयात ‘क्युरेटिव याचिका’व राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करायचा आहे, तर अक्षय कुमारला राष्ट्रपतींकडे पुन्हा दयेचा अर्ज करायचा आहे, त्यामुळे हे होईपर्यंत फशी देऊ नये, असे या दोघांच्या वकिलांचे म्हणणे होते.
समाधान व निषेध
या निकालावर निर्भयाच्या आईने काहीशा नाखुशीने समाधान व्यक्त केले, तर खुन्यांच्या कुटुंबीयांनी निषेध केला. आत्तापर्यंत आम्ही खूप सोसले. अखेरीस नवी ‘डेथ वॉरन्ट’ निघाली, यात समाधान आहे. आता तरी ठरल्यावेळी फाशी दिली जाईल, अशी आशा आहे, असे निर्भयाची आई म्हणाली.