निर्भया: एक दोषी तिहारमध्ये हलवला; एका आरोपीची सर्वोच्च न्यायालयात याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 01:24 AM2019-12-11T01:24:38+5:302019-12-11T01:24:55+5:30
अक्षय कुमार सिंह याने या खटल्यातील चारही दोषींना मृत्युदंडाच्या सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा फेरविचार करावा, अशी याचिका मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात केली
नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील दोषींपैकी एक पवन कुमार गुप्ता (२३) याला येथील मांडोली तुरुंगातून तिहार तुरुंगात नुकतेच हलवण्यात आले आहे, असे तुरुंग अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले.
तिहारच्या तुरूंग क्रमांक दोनमध्ये गुप्ता याला ठेवण्यात आले असून, तेथे याच खटल्यातील दोषी मुकेश सिंह आणि अक्षय यांनाही ठेवण्यात आले आहे, तर आणखी एक दोषी विनय शर्मा याला चार क्रमांकाच्या तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
१६ डिसेंबर, २०१२ रोजी निर्भयावर (२३) धावत्या बसमध्ये सहा जणांनी (त्यात बसचालक, वाहक आणि मदतनीस सहभागी होते) बलात्कार केला होता व नंतर तिची हत्या केली. निर्भया ही फिजिओथेरपीची प्रशिक्षणार्थी होती. या आरोपींमध्ये एक जण अल्पवयीन होता. राम सिंह नावाच्या आरोपीने तुरुंगात आत्महत्या केली. अल्पवयीन आरोपी बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी ठरला. त्याला जास्तीत जास्त तीन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा (तीदेखील सुधारगृहात राहून भोगायची) दिली गेली. नंतर त्याची सुटकाही झाली. उर्वरित चार जण दोषी ठरल्यामुळे त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेली.
फेरविचार याचिका
अक्षय कुमार सिंह याने या खटल्यातील चारही दोषींना मृत्युदंडाच्या सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा फेरविचार करावा, अशी याचिका मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात केली.याच खटल्यातील इतर तीन दोषींनी शिक्षेचा फेरविचार करावा या केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने ९ जुलै, २०१८ रोजी फेटाळून लावल्या होत्या.
अक्षय सिंह याने त्या तिघांसोबत फेरविचार याचिका केली नव्हती, असे त्याचे वकील ए. पी. सिंह यांनी सांगितले. शिक्षेचा फेरविचार करावा, अशी कोणतीच परिस्थिती त्यांना निर्माण करता आलेली नाही, असे सांगून न्यायालयाने त्यांच्या याचिका फेटाळल्या होत्या.
च्या दोषींना दिल्ली उच्च न्यायालय आणि ट्रायल कोर्टने सुनावलेली मृत्युदंडाची शिक्षा २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली होती.