निर्भया प्रकरण : एका आरोपीकडून क्युरेटिव्ह याचिका दाखल; फाशीला स्थगिती देण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 12:12 PM2020-01-09T12:12:31+5:302020-01-09T12:32:01+5:30
Nirbhaya Case : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे देशाचं लक्ष
नवी दिल्ली: निर्भया प्रकरणात न्यायालयानं आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर चारपैकी एका गुन्हेगारानं क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली आहे. या याचिकेच्या माध्यमातून फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी विनय कुमार शर्माकडून सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे. दिल्लीतल्या पटियाला हाऊस न्यायालयानं निर्भया प्रकरणातील सर्व आरोपींची फाशी निश्चित केली.
निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता फाशी दिली जाणार आहे. सर्व आरोपींना फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी निर्भयाच्या आईनं न्यायालयाकडे केली होती. या प्रकरणात न्यायालयानं निर्भयाच्या आईच्या बाजूनं निकाल दिला.
१६ सप्टेंबर २०१२ रोजी दिल्लीत एका अल्पवयीन मुलासह सहा जणांनी चालत्या बसमध्ये एका २३ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. यानंतर तिला बसमधून बाहेर टाकण्यात आलं. या घटनेनं संपूर्ण देश हादरला. या घटनेच्या निषेधार्थ देशाच्या विविध भागांमध्ये आंदोलनं झाली. समाजाच्या सर्वच स्तरांमधून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.
या प्रकरणातील चार दोषींना (विनय शर्मा, मुकेश सिंह, पवन गुप्ता आणि अक्षय कुमार) फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणातील एक आरोपी राम सिंहनं २०१५ मध्ये तिहार जेलमध्ये आत्महत्या केली. तर एका अल्पवयीन आरोपीनं तीन वर्षांसाठी बालसुधारगृहात ठेवण्यात आलं होतं. २०१५ मध्ये त्याची सुटका करण्यात आली.