...मग आमच्या अधिकारांचं काय? दोषींना मुदत मिळताच निर्भयाच्या आईचा सवाल; अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 05:56 PM2019-12-18T17:56:05+5:302019-12-18T18:01:09+5:30
निर्भया प्रकरणातील दोषींना न्यायालयाकडून ७ जानेवारीपर्यंतची मुदत
नवी दिल्ली: निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना ७ जानेवारीपर्यंतची मुदत मिळाली आहे. पटियाला हाऊस कोर्टात या प्रकरणावर सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी दोषींना ७ जानेवारीपर्यंतचा कालावधी दिला. दया याचिकेसारखे पर्याय निवडण्यासाठी न्यायालयाकडून दोषींना मुदत दिली जाताच निर्भयाच्या आईनं टाहो फोडला. त्यांच्याकडे सर्व अधिकार आहेत. मात्र आमचं काय? आमच्या अधिकारांचं काय? असे प्रश्न त्यांनी साश्रू नयनांनी उपस्थित केले.
फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या चारपैकी एका आरोपीची (अक्षय) पुनर्विचार याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली. न्यायमूर्ती आर. भानुमती यांच्या अध्यक्षेताखालील खंडपीठानं अक्षयची याचिका फेटाळताना ती अन्य दोषींनी दाखल केलेल्या याचिकांसारखीच असल्याचं म्हटलं. निर्भया प्रकरणातील इतर आरोपींनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिका न्यायालयानं २०१८ मध्येच फेटाळल्या आहेत.
अक्षय कुमार सिंहच्या वकिलांनी दिल्लीतील प्रदूषण आणि खराब हवेचा हवाला देतानाच, फाशीची शिक्षा दिली जाऊ नये, अशी विनंती केली होती. त्यावर कोणत्याही परिस्थितीत या गुन्ह्यात माफी दिली जाऊ शकत नाही आणि दोषींना फाशीची शिक्षाच व्हायला हवी, असं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं होतं. निर्भया प्रकरणातील आणखी एक दोषी विनयच्या दया याचिकेवर राष्ट्रपतींनी अद्याप निर्णय दिलेला नाही. दया याचिकेशिवाय फाशी होऊ शकत नाही. अक्षय कुमार सिंहसुद्धा राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करु शकतो, असं न्यायमूर्तींनी म्हटलं.