प्रेरणादायी! "मला आणि वडिलांना नातेवाईकांचे टोमणे ऐकावे लागले..."; अखेर 'ती' झाली न्यायधीश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 12:50 PM2024-03-07T12:50:14+5:302024-03-07T12:50:47+5:30
हरियाणाच्या पलवल येथील सराई गावात राहणाऱ्या निर्मला सिंह या न्यायाधीश बनल्या आहेत.
प्रबळ इच्छाशक्ती असेल तर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य होतात अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. हरियाणाच्या पलवल येथील सराई गावात राहणाऱ्या निर्मला सिंह या न्यायाधीश बनल्या आहेत. याआधी त्यांनी दिल्ली पोलिसात एसआय म्हणून काम केलं होतं. निर्मला सांगतात, "जेव्हा मी 2014 मध्ये दिल्ली पोलिसात SI म्हणून रुजू झाले तेव्हा मला आणि माझ्या वडिलांना गावकऱ्यांचे आणि नातेवाईकांचे टोमणे ऐकावे लागले. मुली कुठे पोलिसात नोकरी करतात असं म्हणत होते. पण माझ्या वडिलांनी कोणाचच ऐकलं नाही. मी काम करत राहिले."
"पहिली पोस्टिंग गोविंदपुरी पोलीस ठाण्यात झाली होती. माझ्या नोकरीच्या काळात अनेक मुली, महिला आणि लहान मुलांचा लैंगिक छळ झाल्याची प्रकरणे समोर आली. या काळात मी त्यांना पूर्ण प्रामाणिकपणे मदत केली. त्यांच्या समस्या सोडवल्या. आरोपी पकडले गेले. पोलीस सेवेतील 100 हून अधिक पोक्सो आणि महिलांच्या शोषणाची प्रकरणे सोडवली. तेव्हा समाजात आजही महिलांना न्यायासाठी किती संघर्ष करावा लागतो हे लक्षात आलं."
"त्याच क्षणी माझ्या मनात आले की, माझा उद्देश फक्त आरोपींना पकडणे नाही. महिलांचे शोषण करणाऱ्यांनाही शिक्षा व्हायला हवी. तेव्हापासून मी नोकरीबरोबरच अभ्यास सुरू केला. खूप आव्हानात्मक होतं. गोविंदपुरी पोलीस ठाण्यात काम करा, त्यानंतर तेथून नॉर्थ कॅम्पसमध्ये जाऊन अभ्यास करा. मी तपास अधिकारी होते. मला केव्हाही ड्युटीसाठी बोलावले जायचं. पण मेहनत फळाला आली. अखेर 2024 मध्ये न्यायाधीश बनली. पोलिसात नोकरी करून मुलींना टोमणे मारणाऱ्यांची तोंडं बंद झाली. आता मी त्या गुन्हेगारांना शिक्षाही करू शकतो जे मुली आणि महिलांवर अन्याय करतात."
हरियाणातील पलवल येथील सराय या छोट्याशा गावात राहणाऱ्या निर्मला सिंह यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण गावच्या शाळेतच घेतले. तेही हिंदी माध्यमातून. डीयूच्या कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. त्यानंतर दिल्ली पोलिसांची परीक्षा उत्तीर्ण होऊन एसआय झाल्या. त्यांचा एक भाऊ सैन्यात आहे, तर दुसरा भाऊ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये काम करतो. निर्मला यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे.