‘पीएमसी’च्या ७८% खातेदारांना सर्व रक्कम काढण्याची मुभा- निर्मला सीतारामन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 04:10 AM2019-12-03T04:10:58+5:302019-12-03T04:15:01+5:30
बँकेच्या प्रवर्तकांची मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाई सुरू करण्यात आली.
नवी दिल्ली : घोटाळ्यात अडकलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँकेतून ५0 हजार रुपयेच काढण्याची मर्यादा असली, तरी ७८ टक्के लोकांना त्यांच्या सर्व ठेवी काढण्याची मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत दिली.
त्या म्हणाल्या, वैद्यकीय उपचार, विवाह, तसेच अन्य तातडीच्या कामांसाठी या बँकेच्या खातेदारांना आपल्या खात्यांतून १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढणे शक्य आहे. थोडक्यात, ७८ टक्के खातेदारांना त्यामुळे आपल्या खात्यातील सर्व रक्कम काढणे शक्य झाले आहे. हे अर्थातच लहान खातेदार आहेत आणि अशा खातेदारांची सरकार निश्चितच काळजी घेईल.
या बँकेच्या प्रवर्तकांची मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाई सुरू करण्यात आली असून, ती विकून खातेदारांची सर्व रक्कम परत करण्यात येणार आहे, असे त्या म्हणाल्या.
सीतारामन यांनी सांगितले की, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या तपासातून, एचडीआयएल कंपनीने कर्जाची परतफेड न केल्याने आणि त्या कंपनीला वाटेल तशी नियमबाह्य कर्जे दिल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.
सर्व प्रकरणांची तपासणी
पीएममी बँकेने आपल्याकडील ७0 टक्के रक्कम एकट्या एचडीआयएल कंपनीला दिली होती. त्या कंपनीने घेतलेली कर्जे परतच केली नाहीत. त्यामुळे रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने २४ सप्टेंबर रोजी या बँकेच्या व्यवहारांवर नियंत्रणे आणली. त्यानंतर या बँकेवर प्रशासकही नेमण्यात आला असून, प्रत्येक गैरव्यवहाराचे प्रकरण आता तपासण्यात येत आहे.