निर्मला सीतारामन जिथे 'निरीक्षक' म्हणून गेल्या, तिथे कसा होता भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 06:21 PM2024-12-03T18:21:08+5:302024-12-03T18:23:10+5:30
महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री निवडण्याची जबाबदारी निर्मला सीतारामन यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सीतारामन यांनी आतापर्यंत ३ वेळा निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यावेळी काय घडले... वाचा सविस्तर
Nirmala Sitaraman, Maharashtra CM : महायुतीला मोठे बहुमत मिळाल्यानंतर चर्चेत असलेला प्रश्न म्हणजे महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? या चर्चांना आता लवकरच पूर्णविराम मिळणार आहे. भारतीय जनता पक्षाने अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. निरीक्षकाचे काम विधीमंडळ पक्षाची बैठक घेणे आणि नवीन मुख्यमंत्र्यांची निवड करणे हे असते. भाजपमध्ये मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात निरीक्षकांचा मोठा वाटा असतो. महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री निवडण्याची जबाबदारी निर्मला सीतारामन यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सीतारामन यांनी आतापर्यंत ३ वेळा निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यावेळी काय घडले, हे सविस्तर जाणून घेऊया.
३ पैकी २ वेळा जुन्या चेहऱ्यालाच पसंती
निर्मला सीतारामन यांची गेल्या ७ वर्षात चौथ्यांदा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. सीतारामन यांची यापूर्वी २०१७ मध्ये हिमाचल प्रदेश, २०१९ मध्ये हरयाणा आणि २०२२ मध्ये मणिपूरसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून निवड झाली होती. २०१७ मध्ये हिमाचल निवडणुकीनंतर जयराम ठाकूर यांची विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नेतेपदी निवड करण्यात आली. त्यावेळी जेपी नड्डा आणि प्रेम धुमल हे मुख्यमंत्रीपदाचे मोठे दावेदार होते. पण त्यावेळी जयराम यांचे मुख्यमंत्रीपदासाठीचे नाव 'सरप्राईज' होते. २०१९ मध्ये निर्मला हरयाणात निरीक्षक म्हणून गेल्या. येथील विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत जुने मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. तर २०२२ मध्ये निर्मला यांनी एन वीरेन सिंग या जुन्याच नावावर शिक्कामोर्तब केले.
मुख्यमंत्री निवडीसाठी निर्मला कोणता फॉर्म्युला वापरणार, याची आता चर्चा सुरु आहे. महाराष्ट्र निवडणूक निकालानंतर ११ दिवसांनी निर्मला सीतारामन मुख्यमंत्री निवडण्यासाठी मुंबईला येत आहेत. निर्मला यांच्यासोबत विजय रुपाणी यांचीही नियुक्ती केली आहे. रुपाणी यांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री भाजपकडूनच केले जात आहे.
महाराष्ट्रात तिसऱ्यांदा होणार भाजपाचा मुख्यमंत्री
२०१४ मध्ये पहिल्यांदा भाजपाने महाराष्ट्रात आपला मुख्यमंत्री बनवला. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ हा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर २०१९ मध्ये पहाटेच्या शपथविधीनंतर फडणवीस दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पण ते विश्वासदर्शक ठराव जिंकू शकले नाहीत. त्यानंतर आता महाराष्ट्रात तिसऱ्यांदा भाजपाचा मुख्यमंत्री होणार, हे जवळपास निश्चित आहे.