Nirmala Sitharaman : पेट्रोल-डिझेलच्या दरांत होणार घट?; अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, "केवळ केंद्र सरकारलाच..."
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 05:10 PM2021-03-05T17:10:10+5:302021-03-05T17:12:31+5:30
Petrol Diesel Price Hike : गेल्या अनेक दिवसांपासून वाढत आहेत पेट्रोल डिझेलच्या किंमती, अनेक ठिकाणी पेट्रोलनं गाठली शंभरी
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलडिझेलच्या Petrol diesel किंमतीत दरवाढ होत आहे. अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दरानं शंभरी पार केली. यावरून विरोधकांकडून सातत्यानं केंद्र सरकारवर टीका होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरवाढीवरून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सवाल करण्यात आला. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला यावर बसून चर्चा करावी लागेल असं उत्तर दिलं. यावेळी त्यांनी अर्थव्यवस्थेवरही भाष्य केलं. आम्हाला काही असे संकेत मिळाले आहेत ज्यावरून अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याचं दिसून येत आहे, असं त्या म्हणाल्या.
"पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना बसून चर्चा करावी लागेल. इंधनाच्या किंमतीवर एक्ससाईज ड्युटी लागते. त्याचा जवळपास ४१ टक्के हिस्सा हा राज्यांकडे जातो. अशातच किंमती वाढण्यासाठी केवळ केंद्र सरकार जबाबदार आहे असं म्हणणं अयोग्य आहे," असंही निर्मला सीतारामन म्हणाल्या. "या प्रकरणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी चर्चा केली पाहिजे. केवळ केंद्र सरकारच इंधनावर शुल्क आकारत नाही. यावरील शुल्क राज्य सरकारकडूनही घेतलं जातं. जेव्हा पेट्रोलियम पदार्थांवर महसूल मिळतो त्याचा ४१ टक्के भाग राज्य सरकारला जातो," असंही सीतारामन यांनी नमूद केलं.
यापूर्वीही निर्मला सीतारामन Nirmala Sitharaman यांनी याप्रकरणी आता काहीही बोलणं म्हणजे घाई केल्यासारखं होईल असं म्हटलं होतं. "आम्ही देशातील लोकांच्या गरजा समजू शकतो. याबाबत आता काहीही सांगता येणार नाही. परंतु या प्रकरणी सरकारच्या समोर धर्मसंकट आहे," असं त्या म्हणाल्या होत्या.
इंधनाच्या किंमती वाढण्याची शक्यता
जगात कच्च्या तेलाचे उत्पादक असलेल्या प्रमुख देशांची संघटना OPEC+ नं एक मोठं पाऊल उचललं आहे. OPEC+ नं कच्च्या तेलाच्या उत्पादनात करण्यात येत असलेली कपात एप्रिल महिन्यापर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही त्यांच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली होती. दरम्यान, आता केंद्र सरकारनं करात सूट दिली नाही तर येत्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते.