लेक असावी अशी! वडिलांनी शेती करून भरली कॉलेजची फी; गोल्ड मेडलिस्ट मुलगी झाली 'न्यायाधीश'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 04:34 PM2023-02-24T16:34:18+5:302023-02-24T16:35:57+5:30
सीताराम यांना चार मुली आणि एक मुलगा आहे. त्यांची दुसरी मुलगी निशा कुशवाहची सर्वत्र चर्चा होत आहे.
हेतू चांगला असेल आणि खूप मेहनत केली तर यश नक्कीच मिळते. अशीच प्रेरणादायी गोष्ट मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथील निशा कुशवाहची आहे. निशाचे वडील सीताराम कुशवाह यांनी शेती करून आणि हॉटेलमध्ये कॅशियर म्हणून काम करून आपल्या मुलीला खूप शिकवलं आणि आज मुलगी MPPSC Civil Judge Exam उत्तीर्ण होऊन न्यायाधीश बनली आहे. निशा कुशवाह या समाजातील मुलींसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.
मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथील रहिवासी असलेल्या सीताराम कुशवाह यांच्याकडे स्वतःची 2 एकर शेती आहे, ज्यामुळे कुटुंबाला दोन वेळची भाकरी मिळू शकते. यानंतरही सीताराम यांनी अतिरिक्त उत्पन्नासाठी खासगी हॉटेलमध्ये कॅशियर म्हणून काम केले. सीताराम यांना चार मुली आणि एक मुलगा आहे. त्यांची दुसरी मुलगी निशा कुशवाहची सर्वत्र चर्चा होत आहे.
गोल्ड मेडलिस्ट आहे निशा
निशा कुशवाहने आपले सुरुवातीचे शिक्षण बुरहानपूर येथील एका खासगी शाळेत घेतले. यानंतर सेवा सदन कॉलेजमधून बीकॉम केले आणि सेवा सदन लॉ कॉलेजमधून एलएलबी पूर्ण केले. याच दरम्यान, निशा कुशवाह देवी अहिल्याबाई विद्यापीठात गोल्ड मेडलिस्ट होती आणि राज्याच्या माजी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनीही तिचा गौरव केला आहे.
सीताराम कुशवाह सांगतात की, मला चार मुली झाल्या आणि नंतर एक मुलगा, मला नेहमी मुलींची खूप काळजी वाटायची आणि मुलींना खूप शिकवून स्वतःच्या पायावर उभं करायला हवं असं मला वाटायचं. पण तेही तितके सोपे नव्हते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेतून मला प्रेरणा मिळाली. मुलींची प्रगती होत असताना त्यांना शासनाच्या योजनांमुळे शिष्यवृत्ती मिळू लागली.
या शिष्यवृत्तीमुळे मुलींनी पुढील शिक्षण घेतले. आज माझी दुसरी मुलगी निशा कुशवाह न्यायाधीश झाली, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे आणि मला माझ्या मुलीचा अभिमान वाटतो असंही निशा कुशवाहचे वडील सीताराम कुशवाह यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"