दुकानातील चोरीचं प्रकरण; केंद्रीय मंत्री निशिथ प्रामाणिक कोर्टात सरेंडर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 07:37 PM2023-01-10T19:37:24+5:302023-01-10T19:37:47+5:30
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री निथिश प्रामाणिक यांच्यावर दुकानात चोरी केल्याचा आरोप आहे.
केंद्रीय गृह राज्यमंत्री निशीथ प्रामानिक (nisith pramanik) आज(मंगळवार) 2009 च्या एका चोरीच्या प्रकरणात अलीपूरद्वार न्यायालयात हजर झाले. या चोरीच्या प्रकरणात प्रामाणिक आरोपी आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने त्यांना प्रत्यक्ष हजर राहण्याची मुदत दिल्याच्या दोन दिवस आधीच त्यांनी न्यायालयात आत्मसमर्पण केलं. प्रामाणिक यांच्यासाठी हीच दिलासादायक बाब ठरली, कारण भविष्यात त्यांना या प्रकरणातील न्यायालयीन सुनावणीत वैयक्तिकरित्या हजर राहण्यापासून सूट देण्यात आली आहे. अलीपूरद्वार न्यायालयाच्या न्यायदंडाधिकारी मौमिता मलिक यांनी मंगळवारी हा निकाल दिला.
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक हे कूचबिहारचे खासदार आहेत. 2009 मध्ये दोन दुकानांमध्ये झालेल्या चोरीप्रकरणी अलीपूरद्वार न्यायालयानं 16 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं होतं. पण, कोलकाता उच्च न्यायालयाने 23 नोव्हेंबर रोजी मंत्र्याच्या विरोधात वॉरंटला स्थगिती दिली आणि त्यांना 7 जानेवारी ते 12 जानेवारी 2023 दरम्यान अलीपुरद्वार न्यायालयात न्यायदंडाधिकार्यासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले.
प्रामाणिक म्हणाले – मला प्रकरणात गोवण्यात आलं
अलीपुरद्वार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु पोलिसांनी प्रामाणिक यांना चुकीच्या पद्धतीने गोवलं, असा दावा प्रामाणिक यांच्या वकिलांनी केला. मंगळवारच्या सुनावणीदरम्यान, वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणात त्याचं नाव राजकीय हेतूनं जोडण्यात आलं आहे. प्रामाणिक यांनी न्यायालयाच्या इमारतीबाहेर पत्रकारांशी बोलताना मूळ पोलिस तक्रारीत आपलं नाव नसल्याचं सांगितलं.