निठारी हत्याकांड - विशेष सीबीआय कोर्टाने मनिंदर सिंग आणि सुरिंदर कोलीला नवव्या केसमध्ये ठरवलं दोषी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 01:35 PM2017-12-07T13:35:01+5:302017-12-07T15:01:19+5:30
नोएडाच्या बहुचर्चित निठारी हत्याकांडाच्या नवव्या केसमध्ये विशेष सीबीआय कोर्टाने मनिंदर सिंग आणि सुरिंदर कोली या दोघांना दोषी ठरवलं आहे.
नवी दिल्ली- नोएडाच्या बहुचर्चित निठारी हत्याकांडाच्या नवव्या केसमध्ये विशेष सीबीआय कोर्टाने मनिंदर सिंग आणि सुरिंदर कोलीला या दोघांना दोषी ठरवलं आहे. या प्रकरणावरील शेवटची सुनावणी बुधवारी झाली होती. सीबीआय कोर्टाकडून 8 डिसेंबर रोजी या दोघांना शिक्षा सुनावली जाऊ शकते. सीबीआय कोर्टाने या दोघांना कलम 302, कलम 376 आणि कलमत 364 अंतर्गत दोषी ठरवलं आहे.
#Nithari killings: Special CBI Court finds Maninder Singh Pandher and Surender Koli guilty in the ninth case, under sections 302,376 and 364
— ANI (@ANI) December 7, 2017
याआधी बुधवारी अंतिम सुनावणीसाठी गाझियाबादच्या डासना तुरूंगात शिक्षा भोगत असणारा सुरिंदर कोलीला सीबीआयचे विशेष न्यायाधीस पवन कुमार तिवारी यांच्या समोर हजर करण्यात आलं होतं. निठारी हत्याकांडात मनिंदर सिंग आणि सुरिंदर कोली या दोघांवर एकुण 16 केसेस सुरू आहेत. यापैकी 8 केसेसवर सीबीआयच्या विशेष कोर्टाने निर्णय दिलेला आहे.
काय आहे निठारी हत्याकांड ?
20 जून 2005 रोजी नोएडाच्या निठारी भागातून एक आठ वर्षाची मुलगी अचानक गायब झाली. या घटनेनंतर निठारी भागातून एकामागे एक अशी लहान मुलं गयाब व्हायला लागली. मुलं गायब होण्याची ही घटना एक वर्षभर सुरू होती. वर्षभरात जवळपास बारा लहान मुलं गायब झाली. यानंतर पोलिसांनी एक मोठ सर्च ऑपरेशन सुरू केलं.
7 मे 2006 रोजी एक 21 वर्षीय मुलगी निठारी भागातून गायब झाली. त्यावेळी त्या मुलीच्या मोबाईलमधून पोलिसांना महत्त्वाचा सुगावा लागला.मुलीच्या मोबाइलमधील कॉल डिटेल्सची पोलिसांनी तपासणी केली. या तपासणीमध्ये मनिंदर सिंगचं नाव समोर आलं होतं. यानंतर पोलीस तपासात पूर्ण निठारी प्रकरणाचा खुलासा झाला. ज्यामध्ये 15 पेक्षा जास्त लहान मुली आणि तरूणींवर बलात्कार करण्यात आला. बलात्कारानंतर त्यांची हत्या करून त्यांचे मृतदेह मनिंदरने घरात गाडले होते. 29 डिसेंबर 2006 रोजी पोलिसांना मनिंदरच्या नोएडातील घरात 19 मानवी सांगाडे सापडले होते.
निठारी हत्याकांडाच्या सहा केसेसमध्ये कोर्टाने सुरिंदर कोलीला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कोर्टाने कोलीला एका मुलीच्या हत्येप्रकरणात तसंच अपहरण, बलात्कार आणि पुरावे मिटविण्याच्या आरोपात दोषी ठरवलं. त्याआधी पाच केसेसमध्ये सीबीआय कोर्टाने कोलीला दोषी ठरवत फाशीची शिक्षा दिली आहे. दरम्यान, 2015मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्याची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रूपांतरित केली होती.