CoronaVirus: परदेशातून आलेल्या मदतीचे सर्व राज्यांना समान वाटप शक्य नाही; नीती आयोगाची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 11:43 AM2021-05-13T11:43:49+5:302021-05-13T11:45:25+5:30
CoronaVirus: परदेशातून आलेल्या मदतीचे सर्व राज्यांना समान वाटप शक्य नाही, असे केंद्रीय नीती आयोगाने स्पष्ट केले आहे.
नवी दिल्ली: देशात कोरोनाचे थैमान सुरू आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढत दिसून येत असून, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या उच्चांक गाठत आहे. देशातील परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. यातच कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेड्स यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर परदेशातून मोठ्या प्रमाणावर मदत मिळत आहे. मात्र, परदेशातून आलेल्या मदतीचे सर्व राज्यांना समान वाटप शक्य नाही, असे केंद्रीय नीती आयोगाने स्पष्ट केले आहे. (niti aayog ceo amitabh kant says aid received from foreign country cannot distribute equally in indian state)
एका इंग्रजी वृत्तपत्राला बोलताना नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. परदेशातून भारताला प्राप्त होणारी मदत मर्यादित स्वरुपाची आहे. त्यामुळे राज्यांच्या मागणीनुसार, त्याचे समान वाटप करणे शक्य नाही, असे कांत यांनी स्पष्ट केले. तसेच परदेशातून मिळणारी मदत सरकार ते सरकार, खासगी क्षेत्र ते सरकार आणि राज्य, एनजीओ तसेच नागरी सोसायटी या तीन स्तरावरून होत आहे. या सर्वांचे नियोजन आणि व्यवस्थापन आरोग्य मंत्रालय तसेच नीती आयोगाकडून होत असते, अशी माहिती कांत यांनी दिली.
दिलासा! सीरम आणि भारत बायोटेकने कंबर कसली; महिन्याला १७.८ कोटी लसींचे उत्पादन
गरजेनुसार पुरवठा करण्यावर भर
परदेशातून आलेली मदत आरोग्य विभागाकडे सुपुर्द करण्यात येते. आरोग्य विभाग राज्यांच्या गरजेनुसार पुरवठा करत असते. कोणत्याही राज्याच्या मागणीनुसार पुरवठ्यासाठी एसओपी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार, कामे केली जातात. राज्यावर भार किती आहे, मेडिकल हब कुठे आहे, कोणत्या ठिकाणि संसाधनांची कमतरता आहे आणि भौगोलिक परिस्थिती काय आहे, यावरून सर्व यंत्रणा काम करत असते. तसेच खासगी क्षेत्राकडून सरकारला केल्या जाणाऱ्या मदतीसाठी एक विशेष वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे. याचे व्यवस्थापन नीती आयोगाकडून केले जाते, असेही अमिताभ कांत यांनी नमूद केले.
आता भारतात होणार जॉन्सन अँड जॉन्सन लसीचं उत्पादन!; चाचपणी सुरू
परदेशातून किती मदत मिळाली?
जागतिक पातळीवरील विविध देशांमधून भारताला मदत केली जात आहे. आतापर्यंत भारतात ८७ कन्साइन्मेंट मिळाले आहेत. यापैकी ६३ सरकार आणि २३ खासगी क्षेत्राकडून आले आहेत. लिक्विड ऑक्सिजन जलमार्गे बहरीन, संयुक्त अरब अमिराती आणि फ्रान्स येथून येत आहे. भारताला आताच्या घडीला ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. तसेच अन्य औषधे, पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर आणि पल्स ऑक्सिमीटर यांचीही मदत मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. सर्वाधिक मदत अमेरिकेतून केली जात आहे. तसेच ब्रिटन, इस्राइल, जर्मनी, इटली, फ्रान्स, कॅनडा आणि संयुक्त अरब अमिरातीतून उल्लेखनीय मदत केली जात आहे. यासह दक्षिण कोरिया, कुवैत, नेदरलँड्स, रशिया या देशांतूनही मदत येत आहे. ही प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शी असल्याचे स्पष्टीकरण कांत यांनी दिले आहे.
SII: जगातील सर्वांत मोठी लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूटची कमाई किती?
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ४१२० जण मृत्युमुखी पडले आहेत. याच कालावधीत आणखी ३,६२,७२७ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या २,३७,०३,६६५ झाली आहे. देशातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ३७ लाख १० हजार ५२५ इतकी आहे. देशामध्ये एकूण १७ कोटी ७२ लाख १४ हजार २५६ जणांचं लसीकरण करण्यात आले आहे.