भारताने पुढील महामारीची तयारी करावी; NITI आयोगाचा धडकी भरवणारा अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 05:43 PM2024-10-03T17:43:40+5:302024-10-03T17:44:10+5:30
कोरोना महामारीच्या जखमा अजूनही अनेकांच्या मनात घर करुन आहेत.
NITI Ayog on Pandemic: शतकातील सर्वात मोठी महामारी म्हणून कोरोना महामारीकडे पाहिले जाते. कोरोना महामारीतून गेलेला कोणीच तो काळ विसरू शकत नाही. कोरोनाला 4 वर्षे उलटून गेली तरी ते भयावह वर्ष अजूनही लोकांच्या मनात घर करून आहे. त्या काळात अनेकांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावले आहे. 4 वर्षांनंतरही कोरोना महामारीच्या जखमा ताज्या आहेत. दरम्यान, आता NITI आयोगाने एक अहवाल सादर केला आहे. यामध्ये आरोग्य आपत्कालीन परिस्थिती किंवा महामारीचा सामना करण्यासाठी एक विशेष संस्था तयार केल्याचे सांगितले आहे.
'पँडेमिक प्रिपेडनेस अँड इमर्जन्सी रिस्पॉन्स' (PPER) असे या संस्थेचे नाव आहे. याशिवाय 'पब्लिक हेल्थ इमर्जन्सी मॅनेजमेंट ॲक्ट' (PHEMA) बनवण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी ठेवण्यात आला आहे. याद्वारे महामारीचा उद्रेक झाल्यानंतर 100 दिवसांच्या आत प्रभावी प्रतिसाद सुनिश्चित केला जाईल. कोविड-19 नंतर भविष्यातील महामारीच्या तयारीसाठी आणि आपत्कालीन प्रतिसादासाठी चार सदस्यीय गटाची स्थापना करण्यात आली आहे.
अहवालात असे म्हटले आहे की, महामारीचे पहिले 100 दिवस प्रभावी व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण आहेत. या कालावधीत उपलब्ध होऊ शकणाऱ्या रणनीती आणि प्रतिकारक उपायांसह तयार राहणे महत्त्वाचे आहे. प्रस्तावित शिफारशी नवीन पीपीईआर फ्रेमवर्कचा भाग आहेत, ज्याचा उद्देश कोणत्याही सार्वजनिक आरोग्य आणीबाणीच्या तयारीसाठी रोड मॅप आणि कृती आराखडा तयार करणे आणि या 100 दिवसांमध्ये सुस्पष्ट प्रतिसाद देणे आहे.
अहवालात एक स्वतंत्र कायदा (PHEMA) तयार करण्याची शिफारस केली आहे, जो आरोग्य व्यवस्थापनासाठी सर्वांगीण दृष्टीकोन, प्रतिबंध, नियंत्रण आणि आपत्ती प्रतिसाद, तसेच राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर कार्यक्षम अंमलबजावणीसाठी अनुमती देईल. अहवालानुसार, PHEMA साथीच्या आजाराच्या पलीकडे विविध पैलूंवर लक्ष देऊ शकते. ज्यामध्ये असंसर्गजन्य रोग, आपत्ती आणि जैव-दहशतवाद यांचा समावेश आहे. रणनीती आणि प्रतिकारक उपायांसह तयार राहणे महत्त्वाचे असल्याचेही अहवालात म्हटले आहे.