"जो करणार जातीची बात, त्याच्यावर मारणार सणसणीत लाथ’’, जातिपातीच्या राजकारणावरून नितीन गडकरी संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 04:05 PM2024-07-12T16:05:51+5:302024-07-12T17:06:20+5:30
Nitin Gadkari News: जातिपातीचं राजकारणं हे भारताच्या राजकीय क्षेत्रातील कटू वास्तव आहे. अनेक बडे नेते आणि सर्वच राजकीय पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी कुठे ना कुठे जातिपातीच्या राजकारणाचा आधार घेत असतात. दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीपाच्या राजकारणावर जोरदार टीका केली आहे.
जातिपातीचं राजकारणं हे भारताच्या राजकीय क्षेत्रातील कटू वास्तव आहे. अनेक बडे नेते आणि सर्वच राजकीय पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी कुठे ना कुठे जातिपातीच्या राजकारणाचा आधार घेत असतात. दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीपातीच्या राजकारणावर जोरदार टीका केली आहे.
एका कार्यक्रमामध्ये उपस्थितांना संबोधित करताना नितीन गडकरी म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये सध्या जातिपातीचं राजकारण होत आहे. मी जात-पात मानत नाही. जो जातिपातीची बात करेल, त्याच्यावर मी सणसणीत लाथ मारेन, असा इशाराच नितीन गडकरी यांनी दिला.
गडकरी पुढे म्हणाले की, माझ्या मतदारसंघात ४० टक्के मुसलमान आहेत. मी त्यांना आधीच सांगितलं की, मी आरएसएसचा माणूस आहे. मी हाफ चड्डीवाला आहे. कुणालाही मत देण्यापूर्वी नंतर आपल्याला पुढे पश्चाताप होणार नाही याचा विचार केला पाहिजे. जो मला मतदान करेल त्याचं मी काम करणार आणि जो मत देणार नाही त्याचंही काम करणार, असे गडकरी यांनी सांगितले.
दरम्यान, सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून जातीपातीचं राजकारण कमालीच तीव्र झालेलं आहे. राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी समाप्त होणार असून, राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. मागच्या पाच वर्षांपासून महाराष्ट्राचं राजकारण अनेक उलथापालथींमुळे गाजत आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनता कसा कौल देते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.