तुमचं अभिनंदन करताना मला लाज वाटतेय; उद्घाटनावेळी नितीन गडकरी भडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2020 03:23 PM2020-10-26T15:23:09+5:302020-10-26T15:23:55+5:30
वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्वांनाच नितीन गडकरींनी घेतलं फैलावर
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं. या उद्घाटन सोहळ्यावेळी नितीन गडकरी कामचुकार अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. इमारतीच्या उभारणीला झालेल्या विलंबाबद्दल गडकरी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्वांनाच फैलावर घेतलं.
कोणतंही काम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम होतो. त्यात काम पूर्ण करणाऱ्यांचं कौतुक, अभिनंदन केलं जातं. पण तुमचं अभिनंदन करताना मला संकोच वाटतो, असं नितीन गडकरी म्हणाले. 'अशा पद्धतीची इमारत उभारण्यात येणार असल्याचं २००८मध्ये निश्चित झालं होतं. २०११ मध्ये त्यासाठीची निविदा निघाली आणि हे दोनशे अडीचशे कोटींचं काम नऊ वर्षांनंतर आज पूर्ण झालं. हे काम पूर्ण होण्यासाठी लागलेल्या वेळेत तीन सरकारं आणि आठ अध्यक्ष होऊन गेले. त्यानंतर आज हे काम पूर्ण झालं आहे,' अशा शब्दांत गडकरींनी नाराजी व्यक्त केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सध्याच्या अध्यक्षांचा याच्याशी काही संबंध नाही. पण ज्या महान लोकांनी २०११ पासून २०२० पर्यंत हे काम केलं, त्यांचे फोटो या कार्यालयात लावण्याचा प्रयत्न करा, असा खोचक टोला गडकरींनी अधिकाऱ्यांना लगावला.
८० हजार १ लाख कोटी रूपयांच्या निधीतून तयार करण्यात येणारा दिल्ली-मुंबई महामार्ग तीन वर्षात पूर्ण करणार असल्याचं आपण अभिमानानं सांगत आहोत. इतका मोठा महामार्ग तीन साडेतीन वर्षात पूर्ण होणार असेल आणि या दोनशे कोटीच्या कामासाठी आपण दहा वर्ष लावली, तर हे अभिनंदन करण्यासारखं नाही. मला याची लाज वाटते आहे. जे विकृत विचारांचे लोक (अधिकारी) आहेत, त्यांनी निर्णय न घेता समस्या तयार केल्या, अशा शब्दांत गडकरींनी अधिकाऱ्यांचा समाचार घेतला.
अनेक अधिकारी १२ ते १३ वर्षांपासून चिटकून बसले आहेत. जो कुणी नवीन अध्यक्ष येतो, हे अधिकारी त्याचे मार्गदर्शक होतात. जे पूर्णपणे नकारात्मक आणि विकृत आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी संशय नाही, पण त्यांची विचारधारा विषकन्येसारखी आहे. अशा विकृत लोकांना मार्गदर्शक म्हणून का स्वीकारलं जातं, हे मला कळत नाही. मुख्य महाव्यवस्थापक आणि महाव्यवस्थापकांची परंपरा किती नालायक आणि निकम्मी आहे, याचं उदाहरण म्हणजे ही इमारत. या संस्थेचं इतकं नाव आहे, त्यानंतरही आपण अपयशी ठरलेलो आहोत, असं म्हणत गडकरींनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
माझं नाव बदनाम झालंच आहे. रस्त्यांचं काम पूर्ण करण्यापेक्षा कामचुकार अधिकाऱ्यांना हाकलून लावलं. त्यांना सेवामुक्त केलं, हेच माझं उद्दिष्ट आहे. मला मंत्र्यांचे अधिकार माहीत आहेत. माझा स्वभाव संवेदनशील आहे. लोकांचं वाईट करण्याचा नाही, पण आता मला वाटत अशा लोकांची धुलाई करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. हे काम पूर्ण होत असताना देशाने तीन सरकारं पाहिली. मग मी तुमचं काय अभिनंदन करू? मला अभिनंदन करायचीही लाज वाटते, अशा शब्दांत गडकरींनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.