संपूर्ण जगात रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू भारतात; गडकरींनी राज्यसभेत दिली महत्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 09:55 PM2022-04-06T21:55:26+5:302022-04-06T21:56:38+5:30
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, अशा प्रकरणांमध्ये गंभीर जखमी झालेल्यांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईची रक्कम 12,500 रुपयांवरून 50 हजार रुपयांपर्यंत वाढविली आहे. तसेच, मृत्यू झाल्यास ही रक्कम 25 हजार रुपयांवरून 2 लाख रुपये करण्यात आली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज भारतात होत असलेल्या रस्ते अपघातांसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, रस्ते अपघातात मृत्यू होण्याच्या बाबतीत भारत जगात अव्वल आहे. राज्यसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना गडकरी यांनी सांगितले, की रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या संख्येत भारताचा पहिला क्रमांक लागतो. तर जखमींच्या संख्येत तिसरा क्रमांक आहे.
...तर मिळेल 2 लाख रुपये भरपाई -
रस्ते वाहतूक मंत्रालयाने एका योजनेंतर्गत रस्ते अपघातग्रस्तांना अधिक भरपाई देण्यासाठी एक स्थायी समिती स्थापन केली आहे. ही समिती 'हिट अँड रन' मोटार अपघात योजना 2022 अंतर्गत स्थापन करण्यात आली आहे.
रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, मंत्रालयातील संयुक्त सचिव अमित वरदान यांची समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाचे आणखी दोन सहसचिव - सौरभ मिश्रा आणि अमित सिंह नेगी - यांना स्थायी समितीचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, अशा प्रकरणांमध्ये गंभीर जखमी झालेल्यांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईची रक्कम 12,500 रुपयांवरून 50 हजार रुपयांपर्यंत वाढविली आहे. तसेच, मृत्यू झाल्यास ही रक्कम 25 हजार रुपयांवरून 2 लाख रुपये करण्यात आली आहे.