Farm laws Repeal: “PM मोदींची घोषणा शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता व वचनबद्धता दर्शवते”: नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 05:48 PM2021-11-19T17:48:08+5:302021-11-19T17:49:56+5:30
Farm laws Repeal: विरोधक आणि शेतकरी आंदोलकांसह अनेकांनी या निर्णयाचे स्वागत करत केंद्रातील मोदी सरकारवर निशाणाही साधला आहे.
नवी दिल्ली: गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) तीनही कृषी कायदे रद्द (Farm laws Repeal) करण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर विरोधक आणि शेतकरी आंदोलकांसह अनेकांनी या निर्णयाचे स्वागत करत केंद्रातील मोदी सरकारवर निशाणाही साधला आहे. मात्र, आता भाजप नेत्यांच्याही प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा शेतकऱ्यांबाबत असलेली त्यांची संवेदनशीलता वचनबद्धता दर्शवते, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करत केंद्रीय कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा केली. यानंतर आंदोलक शेतकऱ्यांनी मिठाई वाटत जोरदार जल्लोष केला. परंतु, शेतकरी आंदोलन यापुढेही सुरूच राहील. लगेच ते मागे घेता येणार नाही, अशी भूमिका राकेश टिकैत यांनी मांडली. तर विरोधकांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला हा निर्णय आहे, अशी टीका केली. यानंतर भाजप नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. नितीन गडकरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून मत व्यक्त करत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.
शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता व वचनबद्धता दर्शवते
केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली घोषणा देशाचे अन्नदाते, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांची असलेली संवेदनशीलता आणि वचनबद्धता दर्शवते. गुरू नानक देवजींच्या प्रकाश पर्वाच्या निमित्ताने हे पाऊल सर्वांना सोबत घेऊन देशाला पुढे नेण्याचा पंतप्रधान मोदींचा संकल्प अधोरेखित करते, असे ट्विट नितीन गडकरी यांनी केले आहे.
भारतीय जनता पक्ष सर्वांच्या मतांचा आदर करतो
पंतप्रधान मोदींचे आभार मानतो आणि त्यांनी उचललेल्या या पावलाचे स्वागत करतो. असे कायदे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यात अत्यावश्यक भूमिका बजावू शकतात. पण शेतकऱ्यांचा एक मोठा गट या कायद्यांच्या विरोधात आहे. त्यांच्या भावनांचा आदर करत हे कायदे परत घेण्यात आले आहेत, अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली.
दरम्यान, सरकारच्या या निर्णयानंतर देशभरातील नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले की, 'देशाच्या अन्नदात्याने गर्विष्ठांची मान झुकवली. अन्यायाविरुद्धच्या या विजयाबद्दल अभिनंदन! जय हिंद, जय हिंदचा शेतकरी!'. त्याचवेळी, काँग्रेसने ट्विट करून 'अभिमान तुटला, माझ्या देशाचा शेतकरी जिंकला' असे म्हटले आहे. तर, शेतकऱ्यांपेक्षा कोणी मोठे नाही, हे उशिरा का होईना पण सरकारला कळले आहे. अचानक त्यांना कशी काय जाग आली? प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी अध्यादेश काढता. मग कृषी कायदे रद्द करणारा अध्यादेश का काढला नाही. निवडणुका आल्यावरच अध्यादेश काढणार आहात का, केवळ निवडणुकीसाठी निर्णय घेणार आहात का, अशी टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर केली.