टोल नाक्यांवरून सुटा सुस्साट; टोलचे पैसे बँक खात्यातून होणार वळते
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 11:36 AM2018-04-17T11:36:42+5:302018-04-17T11:36:42+5:30
वाहतूक कोंडी फुटणार; टोल नाके स्मार्ट होणार
नवी दिल्ली: लवकरच टोलनाक्यांवर गाड्यांना थांबावं लागणार नाही. कारण गाड्यांनी टोलनाका ओलांडताच कार चालकाच्या बँक खात्यातून पैसे वळते करुन घेतले जातील. लवकरच अशी व्यवस्था भारतात अस्तित्वात येईल, अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुग्राममध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना दिली.
टोलनाका ओलांडताच टोलची रक्कम चालकाच्या बँक खात्यातून वळती करण्याची व्यवस्था दक्षिण कोरियात अस्तित्वात आहे. मे महिन्यात दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती भारतात येत आहेत. त्यांच्यासोबत टोलच्या नव्या व्यवस्थेसह अनेक विषयांसंदर्भातील सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत. 'टोल नाक्यांवरील वाहनांच्या रांगांमुळे अनेकदा वाहतूककोंडी होते. वाहतूककोंडीच्या समस्येमागील हे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे,' असं गडकरींनी सांगितलं.
टोलची नवी व्यवस्था यासह अनेक विषयांसाठी भारत आणि दक्षिण कोरियात सामंजस्य करार होऊ शकतात. लवकरच दिल्ली ते अलवर-सवाई माधोपूर-वडोदरा मार्गे मुंबई अशा एक्स्प्रेस हायवेचं काम सुरू होणार आहे. यातील पहिला टप्पा वडोदरा ते मुंबई असेल. यासाठी 44 हजार कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. या एक्स्प्रेस वेसाठी एक लाख कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यामुळे दिल्ली-मुंबई प्रवासासाठी लागणारा कालावधी 12 तासानं कमी होईल. सध्या या प्रवासासाठी 24 तास लागतात.