नितिन गडकरी AIMC लागू करणार; मेहनत-वेळ वाचणार, गुणवत्ता सुधारणार; काय आहे हे तंत्रज्ञान?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 11:57 IST2024-12-22T11:54:10+5:302024-12-22T11:57:57+5:30
ही सिस्टिम बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर सर्वेक्षणांसह प्रकल्प स्थितीचा वास्तविक-वेळ आणि डेटा प्रदान करेल. हा डेटा मंत्रालयासह सर्व संबंधित विभागांना पाठवला जाईल.

नितिन गडकरी AIMC लागू करणार; मेहनत-वेळ वाचणार, गुणवत्ता सुधारणार; काय आहे हे तंत्रज्ञान?
राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या बांधकामासाठी होत असलेला विलंब लक्षात घेता, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) ऑटोमेटेड आणि इंटेलिजन्ट मशीन-असिस्टेड कंस्ट्रक्शन (AIMC) सिस्टिमचा वापर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सिस्टिम बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर सर्वेक्षणांसह प्रकल्प स्थितीचा वास्तविक-वेळ आणि डेटा प्रदान करेल. हा डेटा मंत्रालयासह सर्व संबंधित विभागांना पाठवला जाईल.
मंत्रालयाने नुकतेच एक परिपत्रक जारी केले आहे, हे पत्रक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL) सारख्या सर्व संबंधित पक्षांना पाठवले आहे. या परिपत्रकात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमध्ये AIMC च्या वापरासंदर्भात सूचना आणि टिप्पण्या मागवण्यात आल्या आहेत.
एमओआरटीएचच्या एका अधिकाऱ्याने 'द इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या माहितीनुसार, विभागाने ही अखिल भारतीय योजना तयार करण्यासाठी अमेरिका, नॉर्वे आणि युरोपियन युनियन या देशांच्या सिस्टिमचा अभ्यास केला आहे, जेथे AIMC आधीपासूनच लागू आहे.
का आहे AIMC ची आवश्यकता? -
महामार्ग बांधणीसाठी विविध प्रकारच्या यंत्रसामग्रीचा वापर होत असल्याने प्रक्रिया जलद झाली आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आल्याने आणखी एका क्रांतीची वेळ आली आहे. इंटेलिजन्ट रोड कंस्ट्रक्शन मशीन्सच्या विकासामुळे रस्त्यांची गुणवत्ता सुधारते आणि ते अधिक काळ टिकतात. महत्वाचे म्हणजे, यामुळे रियल टाइम डॉक्युमेंटेशन होईल आणि प्रोडक्टिविटीतही सुधारणा होईल. महत्वाचे म्हणजे, या मशीन्समुळे विहित मुदतीत प्रकल्प पूर्ण करण्यास मदत होईल.
AIMC मशीन्ससंदर्भात थोडक्यात? -
AIMC मशीन एक प्रकारे नवे तंत्रज्ञान असलेले मशीन आहे. यात ऑटोमेशन, इंटेलिजन्स, मेकॅनिक्स आणि कंट्रोल यांचा समावेश आहे. सर्वसाधारणपणे AIMC चा वापर वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये केला जातो. जसे की, उत्पादन, बांधकाम, आरोग्यसेवा आणि वाहतूक. अर्थात जेथे, मानवी श्रम कमी करून उत्पादन कार्यक्षमता आणि अचूकता वाढवली जाते. अशा मशीन्सना त्याच्या कार्यानुसार डिझाइन आणि प्रोग्राम केलेले आहे.
अवध एक्स्प्रेसवेवर लागू करण्यात आले AIMC -
अवध एक्सप्रेस वे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लखनौ-कानपूर द्रुतगती मार्गावर NHAI ने प्रायोगिक तत्त्वावर AIMC कार्यान्वित केले आहे. येथे GPS-सहाय्यित मोटार ग्रेडर, इंटेलिजेंट कॉम्पॅक्टर आणि स्ट्रिंगलेस पेव्हर सारख्या स्वयंचलित आणि एआय मशीन्सचा वापर करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पायलट प्रोजेक्टच्या आधारे राष्ट्रीय महामार्ग बांधणीत एआयएमसीचा देशभरात वापर केला जाईल.