Nitin Gadkari YouTube Earning: गडकरींनी ‘बिग बीं’ना दिला ‘गुरुमंत्र’, जाणून घ्या युट्यूबमधून किती होती केंद्रीय मंत्र्यांची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 08:24 AM2022-12-30T08:24:33+5:302022-12-30T08:28:19+5:30
गडकरी आपल्या कमाईतील एक भाग गरीबांसाठी देतात.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे अनेकदा चर्चादरम्यान किंवा मंचावरून अनेक किस्से सांगत असतात. बोलता बोलताच ते अगदी सहजपणे गोष्टी लोकांसोबत शेअरही करत असतात. त्यांचे अनेक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही होतात. Youtube वरही नितीन गडकरी यांचे ४ लाख ६१ हजार सबस्क्रायबर्स आहेत. युट्युबवरूनही गडकरी दर महिन्याला भरपूर कमाई करतात.
आपल्या भाषणाचे व्हिडीओ आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केले जातात. त्या व्हिडीओंना चांगले व्ह्यूजही येत असतात, अशी माहिती खुद्द नितीन गडकरी यांनी इंडियन एक्स्प्रेसच्या अड्डा या कार्यक्रमान दिली. दरम्यान, युट्यूबकडून दर महिन्याला आपल्याला जवळपास तीन लाख रुपये मिळतात, असं गडकरींनी सांगितलं.
प्रामाणिकपणे कमवा, शॉर्टकटमधून कोणताही लाभ नाही, हा माझा मूलमंत्र आहे, असं त्यांनी सांगितलं. पैसा जीवनाचं साधन आहे, पण साध्य असू शकत नाही. देवानं मला जितकं आणि जे काही दिलंय त्यात मी खूप खूष आहे, असंही गडकरी म्हणाले.
आरोग्य महत्त्वाचं
आपल्या फिटनेस आणि दिनचर्येचा संदर्भ देत नितीन गडकरी म्हणतात, की “आरोग्यापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही. प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. तुमची तब्येत ठीक नसेल तर तुम्ही मर्सिडीज कार आणि इतर सुविधांचं काय करणार?” दरम्यान, नितीन गडकरींनी त्यांचे वजन १३५ किलोवरून ८४ किलोपर्यंत कमी केले आहे. नियमित योगासने आणि प्राणायाम केल्यामुळे हे शक्य झाले आहे.
वजन कमी केल्यानंतर एके दिवशी ते अमिताभ बच्चन यांना भेटले. त्यांना पाहून अमिताभ बच्चन अवाक् झाले आणि त्यांनी गडकरींना विचारले, तुम्ही काय केले? तुम्ही १० वर्षांनी लहान दिसत आहात. त्यानंतर मी त्यांना सर्व व्यायाम, योगासने आणि प्राणायामही शिकवलं, असं गडकरींनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं.
कमाईतील एक भाग गरीबांसाठी
“दुनिया नें हमको दिया क्या, दुनिया से हमनें लिया क्या? हे गाणं मला फार आवडतं. मी हिच फिलॉसॉफी फॉलो करतो, चांगले राहा आणि चांगलं काम करत राहा. माझ्या कमाईतील एक भाग मी गरीबांना देतो आणि माझ्या कुटुंबीयांनाही हे सांगितलं आहे,” असं गडकरी म्हणाले.