दागिने विक्रीबाबत काढावा 'सुवर्णमध्य'; नितीन गडकरींचे ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयलांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 08:51 AM2021-05-21T08:51:26+5:302021-05-21T08:52:03+5:30
दागिने हॉलमार्कबाबत नितीन गडकरी यांचे गोयल यांना पत्र
अहमदनगर : देशात हॉलमार्क असलेलेच सोन्याचे दागिने विकण्याबाबतच्या नियमाची अंमलबजावणी १ जूनपासून होणार आहे. सध्या हॉलमार्क सेंटरची कमतरता असल्यामुळे ही मुदत आणखी वर्षभर वाढविण्याची मागणी महाराष्ट्रातील सराफांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. गडकरी यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयल यांना पत्र पाठवून सराफांच्या मागणीबाबत योग्य तो निर्णय घेण्याची विनंती केली आहे.
सरकारने सराफांना १ जूनपासून हॉलमार्क असलेले सोने विकणे बंधनकारक केले आहे. अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नसून केंद्र सरकारकडून सोन्याचे दागिने हॉलमार्क प्रमाणित करून देणाऱ्या सेंटरची संख्या वाढविण्यात आलेली नाही. त्यामुळे सरकारने हॉलमार्क दागिने विकण्याला वर्षभर मुदतवाढ द्यावी, अशी मागणी महाराष्ट्रातील सराफ संघटनांनी तसेच ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक यांनी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. दरम्यान, गडकरी यांनी याबाबत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयल यांना पत्र पाठविले आहे.