नितीन पटेल यांनी जिंकला पाटीदारांचा बालेकिल्ला, मेहसाणातील विजयामुळे भाजपाच्या गोटात आनंद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 01:23 PM2017-12-18T13:23:10+5:302017-12-18T13:31:30+5:30
मुख्यमंत्री विजय रुपानी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी मतांची आघाडी घेतल्यामुळे पक्षावर नामुष्की ओढावेल असे वाटत होते. मात्र मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये रुपानी आणि नितीन पटेल विजयी झाल्यामुळे भाजपाने सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
मुंबई- गुजरात निवडणुकांची मतमोजणी सुरु झाल्यावर एका टप्प्यावर भाजपाचे महत्त्वाचे नेते पराभूत होतील अशी स्थिती निर्माण झाली होती. स्वतः मुख्यमंत्री विजय रुपानी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी मतांची आघाडी घेतल्यामुळे पक्षावर नामुष्की ओढावेल असे वाटत होते. मात्र मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये रुपानी आणि नितीन पटेल विजयी झाल्यामुळे भाजपाने सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
नितीन पटेल हे गुजरातच्या उपमुख्यमंत्रीपदी कार्यरत असणारे भाजपाचे महत्त्वाचे नेते आहेत. मेहसाणा जिल्ह्याच्या आणि पटेल समुदायाच्या राजकारणामध्ये त्यांचे नाव अत्यंत वरच्या स्थानी आहे. 1988 ते 1990 या काळामध्ये नितीन पटेल कादी पालिकेचे अध्यक्ष होते. सुमारे पंधरा वर्षे त्यांनी कादी पालिकेमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. 1990 ते 2002 असा प्रदीर्घकाळ ते विधानसभेत मेहसाणा मतदारसंघातून निवडून गेले. त्यानंतर 2012 मध्ये पुन्हा मेहसाण्यातून निवडून गेले. 1990 पासून मेहसाणा जिल्ह्यामध्ये भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. मेहसाणा मतदारसंघातून 1990 पासून सलग 22 वर्षे खोडाभाई पटेल आमदार म्हणून गुजरात विधानसभेत निवडून गेले. त्यानंतर अनिलभाई पटेल सलग दहा वर्षे भाजपाच्या तिकिटावर विधानसभेत गेले आणि 2012 साली नितीनभाई पटेल मेहसाणा मतदारसंघातून विधानसभेत निवडून गेले.
आनंदीबेन पटेल यांच्याजवळचे नेते म्हणून ओळखले जाणारे नितीनभाई पटेल गेल्या वर्षी मुख्यमंत्री होतील अशी शक्यता निर्माण झाली होती. वयोमानाचे कारण पुढे करत आनंदीबेन पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर नितीन पटेल मुख्यमंत्रीपदी निवडले गेल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून स्पष्टही करण्यात आले होते. मात्र अगदी ऐनवेळी मुख्यमंत्रीपदी विजय रुपानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले व नितीन पटेल उपमुख्यमंत्री झाले. गेल्या वर्षीपासून सुरु झालेल्या पाटीदार आंदोलनाचे मुख्य केंद्र म्हणून मेहसाणा सतत चर्चेत राहिले. हार्दिक पटेलच्या आंदोलनाला तोडीस तोड उत्तर देण्याची जबाबदारी नितीन पटेल यांच्यावर आली. त्यांचा पराभव झाला असता तर भाजपाच्या गुजरातमधील आगामी वाटचालीवर मोठा परिणाम झाला असता पण आता हा धोका टाळण्यात ते यशस्वी झाले आहेत.
BJP workers celebrate outside party Headquarter in #Delhi as trends indicate party's victory in both #Himachal and #Gujaratpic.twitter.com/oyZyVi3Riz
— ANI (@ANI) December 18, 2017