मनातील खदखद डोळ्यांतील अश्रूंमध्ये दिसली, उपमुख्यमंत्र्यांचा कंठ दाटला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 03:27 PM2021-09-13T15:27:47+5:302021-09-13T16:10:57+5:30
उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी आज भुपेंद्र पटेल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना ते भावूक झाल्याचं दिसून आलं. मी भाजपमध्ये गेल्या 30 वर्षांपासून काम करत आहे.
अहमदाबाद - पहिल्यांदाच आमदारपदी निवडून आलेले भूपेंद्र पटेल यांची गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून राज्य भाजप विधिमंडळ पक्षाच्या रविवारी झालेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली. पटेल आज, सोमवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे, गणेशोत्सवातही पटेल यांच्याघरी दिवाळीचे वातावरण आहे. तर, दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या नितीन पटेल यांच्या मनातील वेदना अश्रुंमधून बाहेर पडल्या आहेत.
विजय रुपानी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर हालचालींना वेग आला होता. नाराज असलेल्या पटेल समुदायाचे समाधान करण्यासाठी भूपेंद्र पटेल यांची निवड केल्याचे सांगण्यात आले. भूपेंद्र पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय आहेत. पटेल यांच्या निवडीच्या घोषणेनंतर त्यांच्या अहमदाबाद येथील निवासस्थानी नातेवाईक, शेजारी आणि मित्र परीवाराने गर्दी केली होती. तसेच, या निवडीचे सेलिब्रेशनही करण्यात आले. आमच्यासाठी ही अनपेक्षित सरप्राईज आहे. त्यामुळेच, घरी दिवाळीसारखं वातावरण बनलंय, असे भूपेंद्र यांच्या पत्नी हेतल पटेल यांनी म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी आज भुपेंद्र पटेल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना ते भावूक झाल्याचं दिसून आलं. मी भाजपमध्ये गेल्या 30 वर्षांपासून काम करत आहे. पक्षाने गेल्या 30 वर्षात मला भरपूर दिलंय. नरेंद्र मोदी, आनंदी बेन आणि विजय रुपाणी यांच्या कॅबिनेटमध्येही मला संधी मिळाली. त्यामुळे, मी अजिबात नाराज नसून भुपेंद्र पटेल यांच्याशी माझे कौटुंबिक संबंध असल्याचंही त्यांनी म्हटलं. मात्र, हे बोलत असताना त्यांच्या मनातील खदखद ही डोळ्यांतील अश्रूंमध्ये दिसून आली.
I'm not upset (on the party naming Bhupendra Patel as CM). I've been working in BJP since I was 18 & will keep on working. Whether I get a position in the party or not, I will continue serving in the party: Gujarat Dy CM Nitin Patel pic.twitter.com/FOmMeCIU1O
— ANI (@ANI) September 13, 2021
भूपेंद्र पटेल हे गुजरातचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून आज दुपारी शपथ घेणार आहेत. पुढच्या वर्षी गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत विजय रुपानी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला विजय मिळणे शक्य नाही, असा निष्कर्ष पक्षाच्या सर्वेक्षणातून समोर आला होता. पक्षात रुपानी यांच्याविषयी नाराजी होती. ते राज्यातील कोरोना स्थिती नीटपणे हाताळण्यात अयशस्वी ठरल्याने त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास श्रेष्ठींनी सांगितले. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नवे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांच्या नावाचा प्रस्ताव विजय रुपानी यांनीच मांडला व तो एकमताने संमत झाला.
भाजपचे धक्कातंत्र कायम
- गुजरातचे भावी मुख्यमंत्री म्हणून मनसुख मांडवीय, उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांसह काही जणांची नावे शर्यतीत होती. भूपेंद्र पटेल यांचे नाव अजिबात चर्चेत नव्हते. अशाच नावाची निवड करून भाजपचे आपले धक्कातंत्र कायम ठेवले आहे.