मंत्रिमंडळातील 75 टक्के भ्रष्ट मंत्र्यांबाबत नितीश गप्प का? - तेजस्वी यादव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2017 10:04 PM2017-08-02T22:04:07+5:302017-08-02T22:05:39+5:30
महाआघाडी मोडणाऱ्या नितीश कुमार यांच्याविरोधात राष्ट्रीय जनता दलाकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. काल लालू प्रसाद यादव यांनी नितीश यांची पलटूराम अशी हेटाळणी केल्यानंतर आज तेजस्वी यादव यांनी हल्लाबोल केला आहे.
पाटणा, दि. 2 - महाआघाडी मोडणाऱ्या नितीश कुमार यांच्याविरोधात राष्ट्रीय जनता दलाकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. काल लालू प्रसाद यादव यांनी नितीश यांची पलटूराम अशी हेटाळणी केल्यानंतर आज तेजस्वी यादव यांनी हल्लाबोल केला आहे. नितीश यांच्या मंत्रिमंडळातील 75 टक्के मंत्री भ्रष्ट असून, त्यांच्याबाबत नितीश यांनी मौन का पाळले आहे, असा सवाल तेजस्वी यादव यांनी केला आहे. या मंत्र्यांपैकी काही मंत्र्यांची नावे पनामा पेपर्समध्ये आहेत. आम्ही त्यांच्या चौकशीची मागणी करणार आहोत, असे तेजस्वी यादव यांनी सांगितले.
नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका करताना तेजस्वी यादव म्हणाले, "नितीश कुमार यांचा अंतरात्मा नाही तर खुर्ची आत्मा बोलतो. त्यांनी महाआघाडी तोडून जी चूक केली आहे. त्यासाठी त्यांना नेहमीच टीका ऐकावी लागेल. सामाजिक न्यायाला मानणाऱ्या लोकांना तुम्ही काय उत्तर देणार आहात. ही मंडळी आयुष्यभर तुम्हाला विचारत राहणार. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. मुख्यमंत्री काहीतरी बोलतील असे वाटले होते. पण मी बोलत असताना यांनी थेट प्रक्षेपणच बंद केले. आम्ही सांगितले होते की आम्ही जनतेमध्ये जाऊन सवाल विचारू, पण सभागृहात बोलत असताना माझा आवाज का बंद करण्यात आला. मुख्यमंत्र्यांना याचे उत्तर द्यावे लागेल."
यावेळी लालूप्रसाद यांचा जातीचे राजकारण करणारे नेते अशा नितीश यांनी केलेल्या उल्लेखालाही तेजस्वी यांनी प्रत्युत्तर दिले. तेजस्वी म्हणाले, "लालूजी आणि आरजेडीचे कार्यकर्ते जातीचे राजकारण करतात असे म्हणाले. तर स्वत:ला त्यांनी जननेते म्हणवले. पण मंडल आयोगाचे वारे वाहू लागल्यावर नितीश कुमार यांनी जनतेला धोका देऊन समता पार्टीची स्थापना केली आणि कमंडल हातात घेतले. तेव्हा जनता तर लालूंच्या सोबत होती. "