नितीशकुमार सत्तेशिवाय राहू शकत नाही - जितनराम मांझींचे टीकास्त्र

By admin | Published: February 8, 2015 07:07 PM2015-02-08T19:07:41+5:302015-02-08T19:41:40+5:30

नितीशकुमार सत्तेशिवाय राहू शकत नाही अशी घणाघाती टीका करतानाच जितनराम मांझी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानल्याने मांझींच्या बंडाला भाजपाची फूस असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

Nitish Kumar can not remain without power - Jitnaram Manjhi's criticism | नितीशकुमार सत्तेशिवाय राहू शकत नाही - जितनराम मांझींचे टीकास्त्र

नितीशकुमार सत्तेशिवाय राहू शकत नाही - जितनराम मांझींचे टीकास्त्र

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ८ - बिहारमधील राजकीय संघर्षाचे केंद्र आता दिल्लीत हलले असून बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांझी यांनी नितीशकुमार सत्तेशिवाय राहू शकत नाही अशी घणाघाती टीका करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

रविवारी बिहारमधील राजकीय संघर्ष दिल्लीत भाजपाच्या दरबारी पोहोचला. नीती आयोगाच्या बैठकीनिमित्त दिल्लीत आलेले बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी संध्याकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर जितनराम मांझी यांनी पत्रकार परिषद घेत नितीशकुमार यांच्यावर जोरदार टीका केली. नितीशकुमार सत्तेशिवाय राहू शकत नाही, त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे असे टीकास्त्र जितनराम मांझी यांनी सोडले. विधानसभेत विश्वासदर्शक आणावा असे आव्हानच मांझी यांनी नितीशकुमार यांना दिले. विश्वासदर्शक ठरावात आम्हीच जिंकणार असून ठरावात पराभव झाल्यास मी स्वतःच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईन असे त्यांनी सांगितले. विश्वासदर्शक ठरावात भाजपाचा पाठिंबा घेणार का असा प्रश्न मांझी यांना विचारला असता आम्हाला विधानसभेत जे समर्थन देतील त्यांचे स्वागतच असेल असे सूचक विधानही त्यांनी केले. लालूप्रसाद यादव यांच्या राजदनेही मला पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले. तर पंतप्रधानांशी बिहारच्या विकासाबाबत चर्चा केली. मोदींनी बिहारसाठी केलेल्या सहकार्यासाठी त्यांचे आभार असे त्यांनी म्हटले आहे.

एकीकडे मांझी यांनी भाजपा दरबारी हजेरी लावली असतानाच बिहारमध्ये नितीशकुमार यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. आज दुपारी नितीशकुमार आणि त्यांना पाठिंबा देणा-या अन्य पक्षांच्या प्रतिनिधींनी राज्यपाल कार्यालयाला पत्र दिले. यामध्ये नितीशकुमार यांना १३० आमदारांचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. राजद, काँग्रेसच्या आमदारांनीही नितीशकुमार यांना पाठिंबा दिला आहे. उद्या सकाळी सर्व आमदार राज्यपालांची भेटही घेतील असे समजते. दरम्यान, जदयूमधील अंतर्गत संघर्षाला भाजपा जबाबदार असल्याचा आरोप जदयू नेते करत आहेत. 

Web Title: Nitish Kumar can not remain without power - Jitnaram Manjhi's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.