नितीश कुमार यांनी दगाबाजी केली - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2017 11:12 AM2017-07-27T11:12:14+5:302017-07-27T11:16:39+5:30
आपल्या स्वार्थासाठी एखादी व्यक्ती काहीही करु शकते असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे
नवी दिल्ली, दि. 27 - नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन भाजपाशी हातमिळवणी केल्याने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून हे प्लानिंग सुरु असल्याची आम्हाला माहिती होती, आपल्या स्वार्थासाठी एखादी व्यक्ती काहीही करु शकते असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. दरम्यान नितीश कुमार यांनी बुधवारी संध्याकाळी राजीनामा दिल्यानतर 24 तासांच्या आत सकाळी 10 वाजता पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
Mandate was given to Nitish ji for the anti-communal fight but now he has joined hands with them for his personal politics: Rahul Gandhi pic.twitter.com/yNkEKoJWge
— ANI (@ANI_news) July 27, 2017
'बिहारच्या जनतेने जातीयवादाविरोधात लढा देण्यासाठी नितीश कुमार यांच्या हाती सत्ता दिली होती. मात्र आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी भाजपाशी हातमिळवणी केली आहे. खरं सांगायचं तर गेल्या तीन ते चार महिन्यांपासून हे प्लानिंग सुरु असल्याचं आम्हाला माहित होतं. आपल्या स्वार्थासाठी एखादी व्यक्ती काहीही करु शकते', असं राहुल गांधी बोलले आहेत. 'भारतामधील राजकारणात हीच मोठी समस्या आहे की, सत्तेसाठी व्यक्ती काहीही करतो. कोणताही नियम नाही, विश्वासार्हता नाही', असंही राहुल गांधी बोलले आहेत.
Satta ke liye vyakti kuch bhi kar jaata hai, koi neeyam, credibility nahin hai: Rahul Gandhi on #NitishKumarpic.twitter.com/8eRvp6hdvV
— ANI (@ANI_news) July 27, 2017
बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन बिहारमध्ये राजकीय भूकंप घडविणारे नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजजमान झाले आहेत. विशेष म्हणजे राजीनामा देऊन चोवीस तासही उलटले नाहीत तोवर पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम नितीश कुमार यांनी केला आहे. नितीश कुमार यांनी सहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. सकाळी 10 वाजता राजभवानात त्यांचा शपथविधी पार पडला. नितीश कुमार यांच्यासोबत सुशील मोदी यांचाही शपथविधी पार पडला. सुशील मोदी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
Congratulations to @NitishKumar ji & @SushilModi ji. Looking forward to working together for Bihar’s progress & prosperity.
— Narendra Modi (@narendramodi) July 27, 2017
बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजपा - जदयू समीकरण जुळलं असून 20 महिन्यांच्या आत बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचं सरकार स्थापन झालं आहे. शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून नितीश कुमार आणि सुशील मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. बिहारच्या विकास आणि समृद्धीसाठी एकत्र काम करु असं नरेंद्र मोदी बोलले आहेत. दरम्यान राजभवन परिसरात जमावबंदी लागू करण्यात आल्याने आरजेडीने आयोजित केलेला मोर्चा रद्द करण्यात आला.