मुख्यमंत्रिपदी नितीशकुमारच; बिहार भाजपमध्ये दुमत नाही, मात्र दोन उपमुख्यमंत्रिपदांचा आग्रह
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 12:59 AM2020-11-12T00:59:12+5:302020-11-12T07:04:25+5:30
त्यादृष्टीने वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. बिहारमध्ये भाजपने ७४ तर जेडी
- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : बिहारच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकतांत्रिक आघाडीमध्ये (एनडीए) भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या. आता आधी दिलेल्या शब्दानुसार विद्यमान मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते नितीशकुमार यांच्याकडेच राज्य सरकारचे नेतृत्व राहील, याबाबत भाजपमध्ये कोणतेही दुमत नाही. मात्र, त्या मोबदल्यात भाजपला २ उपमुख्यमंत्रिपदांसह महत्वाची खाती हवी आहेत.
तसेच नव्या मित्रपक्षांनाही मंत्रिमंडळात सामावून घ्यायचे आहे. त्यादृष्टीने वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. बिहारमध्ये भाजपने ७४ तर जेडीयूने ४३ जागा जिंकल्या. राज्यात मित्रपक्षापेक्षा जास्त जागा जिंकण्याची ही भाजपची पहिलीच वेळ. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाने ३१ जागा जास्त जिंकल्या. मतांमध्येही चार टक्क्यांनी वाढ झाली.
भाजपला हवी महत्त्वाची खाती
भाजप आणि जेडीयूला आता सत्तेतील वाट्याचा प्रश्न सोडवायचा आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना कायम ठेवायचे झाल्यास भाजपकडून दोन उपमुख्यमंत्रिपदांची मागणी होऊ शकते. तसेच भाजपला महत्त्वाची खाती हवी आहेत.
विकासशील इन्साफ पार्टी (व्हीआयपी)लाही मंत्रिमंडळात सामावून घ्यायचे आहे. तसेच काँग्रेसच्या १९ आमदारांनाही फोडण्याची भाजपची योजना आहे.
एनडीएमध्ये ‘चिराग’ नको : नितीशकुमार
निवडणुकीत सातत्याने त्यांच्याविरोधात भूमिका घेणाऱ्या लोकजनशक्ती पार्टीला एनडीएमध्ये स्थान देऊ नये, यासाठी नितीशकुमार यांनी भाजपच्या पक्षनेतृत्वाकडे आग्रह धरला आहे.
चिराग यांच्या भूमिकेमुळे नितीशकुमारांना किमान २० जागांवर पराभव पत्कारावा लागला. विशेष म्हणजे, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर नितीशकुमारांना जायचे नाही.
हे सर्व मुद्दे सुटल्याशिवाय जेडीयू केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही.
राय यांच्याकडे राज्याची धुरा?
प्रचाराची धुरा सांभाळून मोठा हातभार लावणारे केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांना उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देऊन राज्यात परत पाठविण्याची भाजपची योजना आहे. त्यांनाच पुढे मुख्यमंत्रिपदी बसविण्याची चर्चा सुरु आहे. राय यांनी यावेळी २०० पेक्षा जास्त सभा घेतल्या. पक्षाचा ‘यादव’ चेहरा म्हणून ते समोर आले.
सीएम बदलण्याचा प्रश्नच नाही
भाजपने जदयूपेक्षा जास्त जागा जिंकल्या. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी दिलेला शब्द भाजप पाळणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, नितीशकुमार यांना बदलण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे सुशील मोदी यांनी स्पष्ट केले. बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनीही हीच भूमिका घेतली.