नितीशकुमार पुन्हा एकदा भाजपाबरोबर जाण्याच्या विचारात?; राजकीय भूकंप होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 08:22 AM2023-07-06T08:22:40+5:302023-07-06T08:23:52+5:30

भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात इतर मित्रपक्षांना बरोबर घेऊन काम करावे लागेल, याची भाजप नेतृत्वाला जाणीव झाली आहे.

Nitish Kumar considering going with BJP once again?; Potential for a political earthquake | नितीशकुमार पुन्हा एकदा भाजपाबरोबर जाण्याच्या विचारात?; राजकीय भूकंप होण्याची शक्यता

नितीशकुमार पुन्हा एकदा भाजपाबरोबर जाण्याच्या विचारात?; राजकीय भूकंप होण्याची शक्यता

googlenewsNext

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमधील खळबळजनक घडामोडीनंतर विरोधी पक्षांमध्ये प्रचंड गोंधळ आणि गदारोळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार पुन्हा एकदा भाजपबरोबर जाण्याच्या विचारात असल्याचे वृत्त पाटण्यातून येत आहे. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी नितीशकुमार यांची भेट घेतल्यामुळे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संदेशवाहक म्हणून काम करू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.

भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात इतर मित्रपक्षांना बरोबर घेऊन काम करावे लागेल, याची भाजप नेतृत्वाला जाणीव झाली आहे. याचमुळे दुरावलेला भागीदार अकाली दलाला एनडीए आणि केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्यावर फेरविचार झाला असावा. भाजपने अकाली दलाचे अध्यक्ष व लोकसभा खासदार सुखबीर सिंह बादल यांनाच त्यांच्या पत्नी हरसिमरत कौर यांच्याऐवजी मंत्रिमंडळात सहभागी होण्यास सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप नेतृत्वाने कर्नाटकात जनता दल (एस)बरोबर युती करण्याचे ठरवले आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांना आता राज्यपाल म्हणून पाठवले जाऊ शकते, असे संकेत आहेत. कारण त्यांच्या पत्नी ज्या काँग्रेसच्या विद्यमान खासदार आहेत त्या नंतर भाजपमध्ये प्रवेश करून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात. दरम्यान, वायएसआर काँग्रेसचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी बुधवारी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतली. ते एनडीएमध्ये सामील होऊ शकतात; परंतु विधानसभा निवडणुकीनंतरच. इतर पाच राज्यांसह नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये लवकर विधानसभा निवडणुका घेण्यासाठी ते इच्छुक आहेत. विधानसभा जिंकल्यानंतर ते लोकसभा निवडणुकीसाठी एनडीएमध्ये सामील होऊ शकतात. त्यांना आंध्र प्रदेशात भाजप- टीडीपी युती रोखायची आहे. कारण त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर आणि पक्षाच्या सदस्यांविरुद्ध सीबीआय आणि ईडीचे १७ खटले आहेत.

  • सुखबीर सिंह बादल यांना कॅबिनेट पदाची ऑफर
  • अमरिंदर सिंह यांना राज्यपाल करणार?
  • जगन रेड्डी यांना आंध्रात हव्यात लवकर निवडणुका
  • हरिवंश यांनी नितीशकुमार यांची भेट घेतल्याने बिहारमध्ये खळबळ

Web Title: Nitish Kumar considering going with BJP once again?; Potential for a political earthquake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.