बाहेर येताच बाहुबलीची नितीश कुमारांवर टीका
By admin | Published: September 11, 2016 07:01 AM2016-09-11T07:01:31+5:302016-09-11T07:01:31+5:30
तब्बल १२ वर्षांनी जामिनावर तुरुंगाबाहेर येताच खुनातील आरोपी असलेला राष्ट्रीय जनता दलाचा माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दिन याने शनिवारी नितीशकुमार यांच्यावर टीका केली.
अनिल सिन्हा, पाटणा
तब्बल १२ वर्षांनी जामिनावर तुरुंगाबाहेर येताच खुनातील आरोपी असलेला राष्ट्रीय जनता दलाचा माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दिन याने शनिवारी नितीशकुमार यांच्यावर टीका केली. नितीशकुमार हे परिस्थितीमुळे मुख्यमंत्री झाले आहेत, ते बिहारचे मुख्यमंत्री आहेत, ते माझे नेते नाहीत, लालुप्रसाद यादव हेच माझे नेते आहेत, असे शहाबुद्दिनने बोलून दाखवले. त्याचे तुरुंगाबाहेर स्वागत करण्यासाठी लालुप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे अनेक नेते, चार मंत्री ३0 आमदार हजर होते.
भागलपूर तुरुंगातून सकाळी बाहेर आल्यावर शहाबुद्दिन म्हणाला की मी माझी प्रतिमा बदलणार नाही. जनतेने गेल्या २६ वर्षांपासून मला ज्या स्वरूपात स्वीकारले आहेत, ती प्रतिमा बदलण्याचे कारण नाही. मी तुरुंगातून बाहेर येण्याचा राजकारणाशी संबंध नाही. न्यायप्रक्रिया पूर्ण करूनच माझी सुटका झाली आहे.
दोनदा आमदार व चारदा खासदार असलेल्या शहाबुद्दिनला ४९ गुन्ह्यांत न्यायालयाने जामीन दिला आहे. तो म्हणाला की, मला या प्रकरणांमध्ये अडकावण्यात आले, हे सर्वांना माहीत आहे. तुमच्या सुटकेमुळे सिवान जिल्ह्यात भीतीचे, दहशतीचे वातावरण आहे, याकडे लक्ष वेधता तो म्हणाला की, सिवानमध्ये २२ लाख लोक राहतात. माझ्या सुटकेमुळे कोणाला भीती वाटत आहे, हे मला माहीत नाही. सर्वच लोक माझ्यावर संतुष्ट असू शकत नाहीत.