पीएम होण्याचे गुण नितीशकुमारांमध्ये नाहीत
By admin | Published: May 10, 2016 03:20 AM2016-05-10T03:20:19+5:302016-05-10T03:20:19+5:30
मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यामध्ये पंतप्रधानपदासाठी लागणारे गुण नाहीत. असे असताना ते पंतप्रधान बनू पाहत असतील, तर ते दिवास्वप्नच ठरेल, असे वक्तव्य
किशनगंज : मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यामध्ये पंतप्रधानपदासाठी लागणारे गुण नाहीत. असे असताना ते पंतप्रधान बनू पाहत असतील, तर ते दिवास्वप्नच ठरेल, असे वक्तव्य बिहारचे माजी मंत्री आणि सत्ताधारी राष्ट्रीय जनता पार्टीचे लोसकभा सदस्य मोहम्मद तस्लिमुद्दिन यांनी केले आहे.
बिहारमध्ये प्रशासनाचा बोजवारा उडाला आहे, दिवसाढवळ्या राज्यात हत्या होत आहेत, राज्यात सुशासन नाही. तरीही नितीशकुमार देशाचे नेते, पंतप्रधान होण्यासाठी प्रयत्न करीत असतील, तर ते यशस्वी होणार नाहीत, अशी टीकाही खा. तस्लिमुद्दिन यांनी केली. तस्लिमुद्दिन पाचव्यांदा लोकसभेवर निवडून गेलेले राष्ट्रीय जनता पार्टीचे नेते आहेत.
नितीशकुमार पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या मदतीने मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनीच राज्यभर दारूचे परवाने दिले होते. दारूची दुकाने उघडली जाताना, शेजारी शाळा, मंदिरे, मशिदी असल्याचाही विचार केला गेला नाही. आता मात्र त्यांना अचानक उपरती झाली आहे. मात्र खऱ्या प्रश्नांकडून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ते असले स्टंट करीत आहेत, असे सांगून ते म्हणाले की, आता नितीशकुमार देशभर दारूबंदी करण्याची भाषा करीत असले तरी ती कदापि यशस्वी होणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे.