नितीशकुमार अखेर एनडीएमध्ये, ९० टक्के सदस्य सोबत असल्याचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 12:05 AM2017-08-20T00:05:05+5:302017-08-20T00:10:12+5:30
नवी दिल्ली / पाटणा : चार वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व नाकारून एनडीएमधून बाहेर पडलेले संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी रविवारी पुन्हा एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संयुक्त जनता दलाला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एनडीए ते एनडीए व्हाया महाआघाडी असे राजकीय प्रवासाचे वर्तुळ यानिमित्ताने पूर्ण झाले आहे.
नितीश यांच्या निवासस्थानी झालेल्या पक्षाच्या बैठकीत एनडीएत सहभागी होण्याचा निर्णय घण्यात आला. नितीशकुमार यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस आणि राजद सोबतची आघाडी तोडून भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे.
दोन गट भिडले
पाटणा : मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर रविवारी नितीशकुमार आणि शरद यादव यांचे समर्थक आपसात भिडल्यामुळे तणाव निर्माण झाला. यादव यांचे समर्थक त्यांना मिरवणुकीने घेऊन जात असताना हा प्रकार घडला. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ हे कार्यकर्ते शरद यादव यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करू लागले.
त्यांच्या हातात काठ्या होत्या. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळातच नितीशकुमार यांचे समर्थक या ठिकाणी हजर झाले आणि त्यांनी शरद यादव समर्थकांना येथून बाजूला केले. शरद यादव हे निलंबित खासदार अली अनवर यांच्यासोबत कारमध्ये होते.
कॅबिनेटमध्ये
मिळणार स्थान
संयुक्त जनता दलाला केंद्रीय मंत्रिमंडळात एक किंवा दोन मंत्रिपदे मिळू शकतात. पर्रीकर गोव्यात गेल्यामुळे, व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती झाल्यामुळे व अनिल दवे यांच्या निधनामुळे तीन जागा रिकाम्या झाल्या आहेत.