नितीशकुमार पाचव्यांदा सत्तारूढ
By admin | Published: November 21, 2015 02:37 AM2015-11-21T02:37:16+5:302015-11-21T04:32:14+5:30
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पराभूत करणारे संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते नितीशकुमार यांनी शुक्रवारी पाचव्यांदा राज्याच्या
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पराभूत करणारे संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते नितीशकुमार यांनी शुक्रवारी पाचव्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांचे धाकटे पुत्र आणि प्रथमच आमदार झालेले तेजस्वी यादव हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत.
पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानात झालेल्या या शपथविधी समारंभात नितीशकुमार यांच्याशिवाय राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची दोन मुले तेजस्वी आणि तेजप्रताप यांच्यासह महाआघाडीच्या २८ मंत्र्यांनी शपथ घेतली. राज्यपाल रामनाथ कोविंद यांनी नव्या मंत्रिमंडळात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात राजद आणि जदयूचे प्रत्येकी १२, तर काँग्रेसच्या ४ मंत्र्यांचा समावेश आहे.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह विविध राजकीय पक्षांचे नेते प्रामुख्याने उपस्थित होते.
शपथविधी समारंभात सर्वांच्या नजरा लालूपुत्रांवर खिळलेल्या होत्या. तेजस्वी आणि तेजप्रताप यादव यांनी अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर शपथ घेतली.
भाजपेतर पक्षांच्या एकजुटीचे प्रदर्शन
नितीशकुमार आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा हा शपथविधी समारंभ म्हणजे शिवसेना, शिरोमणी अकाली दल हे भाजपप्रणीत रालोआतील घटक पक्ष तसेच भाजपेतर पक्षांच्या एकजुटीचे प्रदर्शन करणारा ठरला, असे मानले जात आहे. कार्यक्रमाला शिअदच्या वतीने पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर बादल आणि शिवसेनेतर्फे महाराष्ट्राचे मंत्रिद्वय रामदास कदम व सुभाष देसाई यांनी हजेरी लावली. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंग, केरळचे मुख्यमंत्री ओमन चांडी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा समावेश होता.
तांत्रिक कारणामुळे राहुल गांधींना विलंब
राहुल गांधी यांना दिल्लीहून पोहोचण्यास विलंब झाल्याने कार्यक्रम संपण्याच्या अवघ्या २० मिनिटांपूर्वी ते समारंभस्थळी पोहोचले. गांधी यांना घेऊन येणाऱ्या विमानाने काही तांत्रिक कारणांमुळे तासभर उशिरा उड्डाण केले.
राहुल यांनी स्वत: टिष्ट्वट करून ही माहिती दिली. ते व्यासपीठावर पोहोचले तेव्हा २३ मंत्र्यांनी शपथ घेतली होती. राहुल यांच्या स्वागतासाठी विमानतळावर गेलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चौधरी हे पाचव्या क्रमांकावर शपथ घेणार होते; परंतु वेळेत न पोहोचल्याने त्यांना सर्वात शेवटी २८ व्या स्थानावर शपथ घ्यावी लागली.
लालूपुत्राने केली चूक
लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यांनी मंत्रिपदाची शपथ घेताना चूक केल्याने त्यांना पुन्हा शपथ घ्यावी लागली. त्यांनी ‘अपेक्षित’ या शब्दाऐवजी ‘उपेक्षित’ असे उच्चारण केले. ही चूक राज्यपालांच्या लक्षात आल्याने त्यांनी तेजप्रताप यांना पुन्हा शपथ घेण्यास सांगितले.
मुलायमसिंग यादव
यांची अनुपस्थिती
शपथविधी कार्यक्रमात समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंग यादव आणि त्यांचे पुत्र तथा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव सहभागी झाले नव्हते; परंतु मैनपुरीमधील सपाचे खासदार आणि लालूप्रसाद यांचे जावई तेजप्रतापसिंग मात्र हजर होते.
बिहारमध्ये नितीशकुमार यांच्यासह एकूण २९ मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यघटनेतील तरतुदीनुसार मंत्रिमंडळात अजूनही सात जागा रिक्त आहेत. संजद, राजद आणि काँग्रेस आपल्या नाराज नेत्यांना मंत्रिपद देऊन यांची भरपाई करू शकतात.
२४३ सदस्यीय विधानसभेत १५ टक्के म्हणजे मुख्यमंत्र्यांसह एकूण ३६ मंत्री सामील होऊ शकतात. निवडणुकीतील संख्याबळानुसार राजदला १६, संजदला १४ आणि काँग्रेसला ५ मंत्रिपदे मिळतील, अशी चर्चा आहे.
या मंत्र्यांनी घेतली शपथ
राजद...
तेजस्वी यादव- उपमुख्यमंत्री
तेजप्रताप यादव- आरोग्य
अब्दुल बारी सिद्दीकी- अर्थ
आलोककुमार मेहता
चंद्रिका राय
रामविचार राय
शिवचंद राम
अब्दुल गफूर
चंद्रशेखर
मुनेश्वर चौधरी
अनिता देवी
विजय प्रकाश
जनता दल (सं.)...
विजेंद्र प्रसाद यादव
राजीव रंजनसिंग ऊर्फ ललन सिंग
श्रवणकुमार
जयकुमार सिंग
कृष्णनंदन प्रसाद वर्मा
महेश्वर हजारी
शैलेशकुमार
मंजू वर्मा
संतोषकुमार निराला
खुर्शीद ऊर्फ फिरोज अहमद
मदनसिंग
कपिलदेव कामत
काँग्रेस...
अशोककुमार चौधरी
अवधेशकुमार सिंग
अब्दुल जलील मस्तान
मदन मोहन झा