झारखंडमध्ये भाजपाला नितिशकुमारांचा 'दे धक्का'; सत्तेची गणिते बदलणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 12:27 PM2019-11-20T12:27:26+5:302019-11-20T12:29:59+5:30
महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपपासून फारकत घेतल्याचे पडसाद झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत उमटले आहेत. झारखंडमधील भाजप आणि मित्रपक्षांत अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, ते एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे करीत आहेत.
रांची : लोकसभा निवडणुकीनंतर दुय्यम केंद्रीय मंत्रिपदावरून नाराज असलेल्या बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी भाजपाला जोरदार धक्का दिला आहे. झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली असून तेथील मुख्यमंत्री रघुवर दास यांच्याविरोधातच दंड थोपटणाऱ्या भाजपाच्या बंडखोर मंत्र्याला थेट पाठिंबाच जाहीर करून टाकला आहे. यामुळे झारखंडमध्ये आधीच एक मित्रपक्ष गमावणाऱ्या भाजपासमोर विजयाचे फासे उलटताना दिसत आहेत.
महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपपासून फारकत घेतल्याचे पडसाद झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत उमटले आहेत. झारखंडमधील भाजप आणि मित्रपक्षांत अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, ते एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे करीत आहेत. नितीशकुमार यांचा जेडीयु स्वबळावर ही निवडणूक लढत आहे. आतापर्यंत त्यांनी २५ उमेदवार जाहीर केले आहेत. तर एनडीएचा घटक पक्ष असलेली लोक जनशक्ती पार्टी (एलजेपी) स्वबळावर झारखंड विधानसभा निवडणूक लढणार आहे. असे असताना भाजपाचे मंत्री सरयू राय यांनी मुख्यमंत्र्यांविरोधातच बंडखोरी करत आव्हान उभे केले आहे. याला नितिशकुमार खतपाणी घालत आहेत.
भाजपाच्या अडचणी एवढ्याच नाहीत तर बिहारचे भाजपाचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी हे राय यांचे चांगले मित्र आहेत. नितिश कुमार यांचीही राय यांच्यासोबत चांगली मैत्री आहे. राय यांच्या या संबंधांचा भाजपाला फटका बसण्याची शक्यता असल्याने भाजपाने मोदी यांनाच स्टार प्रचारकाच्या यादीतून वगळले होते. राय यांनी बंडखोरी करताच नितिश कुमार यांनी उघडपणे राय यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच राय यांच्यासाठी निवडणुकीत प्रचार करणार असल्याचेही म्हटले आहे.
दुसरीकडे झारखंड मुक्ती मोचार्चे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनीही राय यांना उघडपणे पाठिंबा जाहीर केला आहे. नितिशकुमार यांच्या या भुमिकेमुळे जदयूचे उमेदवार जमशेदपूरमध्ये येऊनही उमेदवारी अर्ज न भरताच माघारी गेले. पूर्व आणि पश्चिम मतदारसंघातील दोन्ही उमेदवार होते. नितिशकुमार यांनी जदयूच्या कार्यकर्त्यांना राय यांचा प्रचार करण्याचे आदेश दिले आहेत. राय यांच्यासाठी नितिशकुमार तीन सभा घेणार आहेत. नितिशकुमार यांच्याशी मैत्री असल्याने आपल्याला उमेदवारी नाकारल्याचा आरोप राय यांनी भाजपावर केला आहे.