बिहारमधील नितीश कुमार सरकार संकटात? जेडीयूचे १७ आमदार आरजेडीच्या संपर्कात

By बाळकृष्ण परब | Published: December 30, 2020 09:46 AM2020-12-30T09:46:29+5:302020-12-30T09:51:40+5:30

Nitish Kumar Government : एनडीएमध्ये भाजपा मोठा तर नितीश कुमारांचा जेडीयू लहान पक्ष ठरल्याने या सरकारवर स्थापनेपासूनच अस्थिरतेची तलवार टांगली गेली आहे.

Nitish Kumar government in crisis in Bihar? 17 JDU MLAs in touch with RJD | बिहारमधील नितीश कुमार सरकार संकटात? जेडीयूचे १७ आमदार आरजेडीच्या संपर्कात

बिहारमधील नितीश कुमार सरकार संकटात? जेडीयूचे १७ आमदार आरजेडीच्या संपर्कात

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय जनता दलाचे नेते श्याम रजक यांनी नितीश कुमार सरकारच्या भवितव्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट जेडीयूचे १७ आमदार आरजेडीच्या संपर्कात असून, ते लवकरच लालूप्रसाद यादव यांच्या पक्षात दाखल होतीलजेडीयूचे प्रवक्ते राजीव रंजन यांनी श्याम रजक यांचा दावा लावला फेटाळून

पाटणा - अत्यंत अटीतटीच्या झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने काठावरचे बहुमत मिळवत सत्ता राखली होती. मात्र एनडीएमध्ये भाजपा मोठा तर नितीश कुमारांचा जेडीयू लहान पक्ष ठरल्याने या सरकारवर स्थापनेपासूनच अस्थिरतेची तलवार टांगली गेली आहे. दरम्यान, राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते श्याम रजक यांनी नितीश कुमार सरकारच्या भवितव्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. जेडीयूचे १७ आमदार आरजेडीच्या संपर्कात असून, ते लवकरच लालूप्रसाद यादव यांच्या पक्षात दाखल होतील, असा दावा, रजक यांनी केला आहे.

श्याम रजक यांनी सांगितले की, हे सर्व आमदार भाजपाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. त्यामुळे जेडीयूला सोडचिठ्ठी देऊन आरजेडीमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. सध्या या आमदारांना थांबवण्यात आले आहे. जर हे आमदार सध्या आरजेडीमध्ये दाखल झाले तर त्यांच्यावर पक्षांतर कायद्यांतर्गत कारवाई होऊन त्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. मात्र या कायद्यानुसार जेडीयूचे २५ ते २६ आमदार पक्ष सोडून आरजेडीमध्ये आल्यास त्यांच्या सदस्यत्वाला धोका निर्माण होणार नाही.

जेडीयूचे अजून काही आमदार पक्ष सोडण्याचा विचार करतील आणि आरजेडीमध्ये दाखल होतील. सध्या माझ्या माध्यमातून हे १७ आमदार आरजेडीच्या संपर्कात आहेत, असा दावा रजक यांनी केला. तसेच सध्या संपूर्ण घटनाक्रमावर आपली नजर असल्याचेही रजक यांनी सांगितले. भाजपाने अरुणाचल प्रदेशमध्ये जेडीयूच्या सहा आमदारांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. या घटनेमुळे भाजपा नितीश कुमार यांच्यावर वर्चस्व दाखवू लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे बिहारमधील हे १७ आमदार नाराज आहेत, असा दावा रजक यांनी केला.

मात्र जेडीयूचे प्रवक्ते राजीव रंजन यांनी श्याम रजक यांचा दावा फेटाळून लावला आहे. श्याम रजक यांचा दावा भ्रामक आणि दिशाभूल करणारा असल्याचे राजीव रंजन यांनी म्हटले आहे. तसेच जेडीयू पूर्णपणे एकसंध असून, भाजपासोबत सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच जेडीयूचे आमदार आरजेडीच्या संपर्कात नाहीत तर आरजेडीचेच आमदार तेजस्वी यादव यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची टीका राजीव रंजन यांनी केली.

२४३ सदस्य असलेल्या बिहार विधानसभेत बहुमताचा आकडा १२३ आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला १२५ तर आरजेडीच्या नेतृत्वातील महाआघाडीला ११० जागा मिळाल्या होत्या. एनडीएमध्ये भाजपाला ७४ तर जेडीयूला ४३ आणि इतर पक्षांना ८ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे या आकड्यात किंचीत बदल झाला तरी नितीश कुमार सरकार अडचणीत येऊ शकते.

Web Title: Nitish Kumar government in crisis in Bihar? 17 JDU MLAs in touch with RJD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.