नितीश कुमार सरकार पदवीधर मुलींना देणार प्रत्येकी ५० हजार रुपये!
By मोरेश्वर येरम | Published: December 14, 2020 07:28 PM2020-12-14T19:28:26+5:302020-12-14T19:29:44+5:30
नितीश कुमार यांनी दिलेल्या आश्वासनाला जागत लवकरच मोठी घोषणा करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
पाटणा
बिहारमध्ये पुन्हा सत्तेत आल्यास पदवीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली होती. आता नितीश कुमार यांनी दिलेल्या आश्वासनाला जागत लवकरच मोठी घोषणा करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री पदवीधर विद्यार्थिनी प्रोत्साहन योजनेअंतर्गत राज्यातील लाभार्थी मुलींच्या बँक खात्यात प्रत्येकी ५० हजार रुपये जमा करण्यासाठीचा प्रस्ताव बिहारच्या शिक्षण विभागाने तयार केल्याचं समजतं. लवकरच हा प्रस्ताव अर्थ विभागाकडे देखील पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर कॅबिनेटची मंजुरी घेतली जाईल. विशेष म्हणजे, यावेळी मागच्या वेळेपेक्षा १०० कोटींहून अधिक रक्कम यावेळी दिली जाणार आहे.
१.५० लाख पदवीधर विद्यार्थिनींना होणार लाभ
उच्च शिक्षण संचालनालयातील एका अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री पदवीधर विद्यार्थिनी पदवीधर योजनेतील यंदाच्या वाढीव मदतीमुळे याचा राज्यातील जवळपास १.५० लाख विद्यार्थिंनींना फायदा होणार आहे. याआधी पदवीधर विद्यार्थिंनीना २५ हजार रुपयांपर्यंतच्या मदतीची तरतूद होती. गेल्या वर्षी एकूण १.४० लाख विद्यार्थिंनींचे यासाठी अर्ज आले होते. त्यातील ८४ हजार ३४४ विद्यार्थिंनींच्या खात्यात प्रोत्साहन निधी जमा करण्यात आला होता. उर्वरित अर्ज हे काही त्रृटी असल्याने ते संबंधित महाविद्यालयांना परत पाठविण्यात आले होते. त्यातील सर्व त्रृटी संपुष्टात आल्यानंतर लाभार्थी विद्यार्थिनींच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे.
३०० कोटी रुपयांची तरतूद
राज्य सरकारच्या मान्यता प्राप्त महाविद्यालयांमधील पदवीधर विद्यार्थिनींच्या प्रोत्साहनासाठी रोखरकमेच्या स्वरुपात मदत केली जाते. २०१९-२० या वर्षात या योजनेसाठी शिक्षण विभागाकडून २०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. यावेळी २०२०-२१ या वर्षात त्यात १०० कोटींची वाढ करुन एकूण तरतूद आता ३०० कोटी रुपयांची केली जाणार आहे.