भाजपसोबत हातमिळवणी करुन नितीशकुमार यांनी स्वतःचे नुकसानच केले - लालूप्रसाद यादव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2017 06:15 PM2017-09-03T18:15:41+5:302017-09-03T18:16:59+5:30
नितीशकुमार दोन नावेत पाय ठेवून प्रवास करत आहेत, त्यांनी चलाखी करून भाजपसोबत हातमिळवणी केली खरी मात्र ते आता आपल्याच चक्रव्युहात फसले आहेत.
पाटाणा, दि. 3 - आज मोदी सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार राष्ट्रपतीभवनात पार पडला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये 9 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर चार राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बडती देण्यात आली आहे. या विस्तारामध्ये जदयू, एआयडीएमके यांनाही स्थान मिळेल असे वाटत होते, मात्र तसे काहीही घडले नाही. महाआघाडीत असताना नितीशकुमार यांना जी किंमत होती ती आता तिथे म्हणजे एनडीएत गेल्यावर कधीही मिळणार नाही. नितीशकुमार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करुन स्वतःचे नुकसानच केले आहे. अशी टीका लालूप्रसाद यादव यांनी नितीशकुमार यांच्यावर केली आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात नितिशकुमार यांच्या पक्षाला एकही मंत्रीपद दिले नाही. हाच धागा पकडून लालूंनी पुन्हा एकदा नितीशकुमार यांना लक्ष केलं आहे.
नरेंद्र मोदी यांनी नितीशकुमार यांना मंत्रिमंडळ विस्तारासाठी साधे निमंत्रणही दिले नाही. भाजपला नितीशकुमार यांच्यावर विश्वास उरलेला नाही अशी टीका लालूप्रसाद यादव यांनी केली आहे. लालूप्रसाद यादव यांनी ट्विट करत नितीशकुमार यांच्यावर टीका केली आहे. एका ट्विटमध्ये ते म्हणाले की, नितीशकुमार दोन नावेत पाय ठेवून प्रवास करत आहेत, त्यांनी चलाखी करून भाजपसोबत हातमिळवणी केली खरी मात्र ते आता आपल्याच चक्रव्युहात फसले आहेत. ते सातत्याने आपली भूमिका बदलतात, त्याचमुळे तोंडावर पडतात. भाजपसोबत जाऊन त्यांनी स्वतःचे नुकसानच करून घेतले आहे. महाआघाडीत असताना नितीशकुमार यांना जी किंमत होती ती आता तिथे म्हणजे एनडीएत गेल्यावर कधीही मिळणार नाही असा घणाघणाती आरोपही त्यांनी केला आहे.
दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, नितीशकुमार प्रसारमाध्यमांना सांगत फिरत आहेत, की मंत्रिमंडळ विस्तार आणि कोणतेही पद देण्याबाबत आमच्याशी चर्चाच झाली नाही, मात्र यांना कोणतीही किंमत नाही हे आता स्पष्ट झाले आहे. नितीशकुमारांवर निशाणा साधला आहे. नितीशकुमार यांना बिहारमध्ये काँग्रेस पक्ष फोडायचा आहे, त्याची सुरूवात त्यांनी महाआघाडीतून बाहेर पडण्यापासून केली. आता भाजपवर जदयूचा विश्वास उरलेला नाही आणि जदयूला भाजपवर विश्वास उरलेला नाही. अशात आता नितीशकुमारांना भीती वाटते आहे की त्यांचा पक्ष फुटेल.
एनडीएचा मृत्यू झालाय, एनडीएचे अस्तित्व केवळ कागदावरच - संजय राऊत
सेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर भाजपावर जोरदार टीका केली आहे. भाजपाच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात आलेल्या एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीची हत्या झाली आहे. तिचे अस्तित्व आता केवळ कागदावर उरले आहे, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली आहे.
आज झालेल्या मोदींच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेला स्थान मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र
'केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्याचं सोडाच; साधी विचारणाही न झाल्यानं शिवसेना प्रचंड संतापली आहे. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात, एनडीए ही फक्त कागदावर आणि बैठकांपुरती उरली आहे. प्रत्यक्षात एनडीएचा मृत्यूच झाला आहे,' अशी जळजळीत प्रतिक्रिया शिवसेनेनं केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलतानात संजय राऊत म्हणाले," एनडीएबाबत आता फार काही विचारू नका. एनडीएची हत्या झाली आहे. एनडीए आता केवळ कागदोपत्री उरली आले. आता केवळ बैठकांपुरते तिचे अस्तित्व उरले आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि अधिवेशनापुरती भाजपाला एनडीएची आठवण येते."
आज भाजपाकडे 282 जागा आहेत. त्याच जर 240 असत्या तर भाजपाला घटक पक्षांचे महत्त्व कळले असते, त्यांच्याकडे बहुमत आहे. बहुमत नसते तर ते मुंबई, हैदराबामध्ये आमंत्रणे घेऊन फिरले असते, असेही ते पुढे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने शिवसेनेकडून नाराजीचा सूर आळवण्यात आला. शिवसेना मंत्र्यांच्या शपथविधीला अनुपस्थित राहिली. त्यामुळे शिवसेना आणि भाजपामधील मतभेत पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे.