कुणाला तरी CM बनण्यासाठी नितीश कुमारांवर विषप्रयोग होतोय, माजी सहकाऱ्याचा सनसनाटी दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 06:12 PM2023-11-10T18:12:15+5:302023-11-10T18:14:22+5:30
Nitish Kumar : नियोजित कटकारस्थानानुसार नितीश कुमार यांना भोजनामधून विषारी पदार्थ दिला जात आहे. नितीश कुमार ज्याप्रकारे बोलत आहेत, त्यावरून त्यांच्या भोजनामध्ये विषारी पदार्थ मिसळून कट रचला जात आहे, असा दावा करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून बिहारमधील राजकारण हे चर्चेचा विषय ठरले आहे. जातीआधारित जनगणना, त्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य आणि आता आरक्षणाचा वाढवण्यात आलेला कोटा यामुळे येथील घडामोडी राष्ट्रीय राजकारणात केंद्रस्थानी आल्या आहेत. याचदरम्यान बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी नितीश कुमार यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे खळबळ माजण्याची शक्यता आहे. नियोजित कटकारस्थानानुसार नितीश कुमार यांना भोजनामधून विषारी पदार्थ दिला जात आहे. नितीश कुमार ज्याप्रकारे बोलत आहेत, त्यावरून त्यांच्या भोजनामध्ये विषारी पदार्थ मिसळून कट रचला जात आहे, असा दावा मांझी यांनी केला आहे.
जीतनराम मांझी म्हणाले की, कुणाला तरी झटपट मुख्यमंत्री बनवण्यासाठी नितीश कुमार यांच्याविरोधात कट रचला जात आहे. त्यांच्या भोजनामध्ये विषारी पदार्थ मिसळला जात आहे. गुरुवारी सभागृहामध्ये नितीश कुमार हे जीतनराम मांझी यांच्यावर संतापले होते. माझ्या मुर्खपणामुळे जीतनराम मांझी हे बिहारचे मुख्यमंत्री बनले होते, आता त्यांना राज्यपाल बनायचं आहे, अशी टीका केली होती. त्यानंतर आज जीतनराम मांझी यांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधत नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला. तसेच सभागृहातच ठिय्या आंदोलन केले.
दरम्यान नितीश कुमार यांच्या निकटवर्तीयांवर विरोधी पक्षनेते विजय सिन्हा यांनीही आरोप केला आहे. हे म्हणाले की, जीतनराम मांझी हे जो आरोप करत आहेत, त्याची चौकशी झाली पाहिजे. जे लोक नितीश कुमार यांच्या जवळ आहेत, त्यांची चौकशी झाली पाहिजे. मांझी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे, असे ते म्हणाले.