जेडीयूच्या अध्यक्षपदी नितीशकुमार

By admin | Published: April 11, 2016 02:29 AM2016-04-11T02:29:50+5:302016-04-11T02:29:50+5:30

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची रविवारी संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पक्षाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे नितीशकुमार हे आता राष्ट्रीय राजकारणात

Nitish Kumar as JDU's president | जेडीयूच्या अध्यक्षपदी नितीशकुमार

जेडीयूच्या अध्यक्षपदी नितीशकुमार

Next

हरीश गुप्ता,  नवी दिल्ली
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची रविवारी संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पक्षाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे नितीशकुमार हे आता राष्ट्रीय राजकारणात सक्रिय भूमिका बजावण्यासाठी सज्ज झाले आहेत.
२०१९ च्या लोकसभा निवडणुका होईपर्यंत नितीशकुमार हे बिहारचे मुख्यमंत्री आणि संजदचे अध्यक्षपद अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणार आहेत.
संजदच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने नितीशकुमार यांची पक्षाध्यक्षपदी निवड करून १९८९ मध्ये दिवंगत व्ही.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात असलेल्या जनता दलाचे पुनरुज्जीवन होण्याचे संकेत दिले आहेत.
सर्व जुन्या बिगर काँग्रेसी आणि बिगर भाजप धर्मनिरपेक्ष पक्षांचे विलीनीकरण करणे हे नितीशकुमार यांचे ध्येय आहे. लालूप्रसाद यादव यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय जनता दलाचेही येत्या काही महिन्यांत संयुक्त जनता दलात विलीनीकरण करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त जनता दलाने राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस आणि डाव्या आघाडीसोबत, तर विविध राज्यांमध्ये अन्य दहा पक्षांसोबत आघाडी केलेली असेल. २०१९ ची लोकसभा निवडणूक ‘मोदी विरुद्ध अन्य सर्व’, अशी बनविणे हा त्यामागचा मुख्य हेतू आहे.
नितीशकुमार यांनी हे ध्येय गाठावे, अशी जबर इच्छा असल्यामुळेच शरद यादव यांनी संयुक्त जनता दलाचा चौथ्यांदा अध्यक्ष बनण्यास नकार दिला, अशी माहिती यादव यांच्याशी जवळीक असलेल्या सूत्रांनी दिली. यादव यांना सलग तिसऱ्यांदा पक्षाध्यक्ष बनविण्यासाठी २०१३ मध्ये संयुक्त जनता दलाच्या घटनेत बदल करण्यात आला होता.
मागच्या दहा दिवसांत नितीशकुमार यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सोबत दोन वेळा बैठक घेतली आणि माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनाही ते भेटले, असे सूत्रांनी सांगितले.
> जनता दलाने केंद्रातील सत्ता गमावल्यानंतर या पक्षाचे अनेक तुकडे झाले होते. वेगवेगळ्या झालेल्या या जनता दल परिवाराचे पुन्हा एकत्रीकरण करण्याचा आणि पुन्हा एक पक्ष निर्माण करण्याचा आपला हेतू आहे, असे नितीशकुमार यांनी पक्षाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जाहीर केले.
नितीशकुमार यांनी या ऐक्याबाबत अगोदरच रालोदचे अजित सिंग, जनता दल (एस)च्या केरळ गटाचे ए.पी. वीरेंद्र कुमार, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे अध्यक्ष एच.डी. देवेगौडा, एसजेपीचे नेते कमल मोरारका आणि अन्य नेत्यांसोबत चर्चा केलेली असल्यामुळे जनता परिवाराच्या एकीकरणाची तशीही सुरुवात झालेली आहे.

Web Title: Nitish Kumar as JDU's president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.