"विभिषण रामाचा आश्रय घेऊ शकतो, मग नितीश कुमार...", सत्तांतरावर रामभद्राचार्यांचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 10:05 AM2024-01-29T10:05:47+5:302024-01-29T10:06:42+5:30
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी भाष्य केले.
बिहारमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेले राजकीय नाट्य रविवारी संपुष्टात आले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा राष्ट्रीय जनता दल सोडून भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील झाले आहेत. नितीश कुमार यांनी भाजपासोबत जात 9 व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान, जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी विभिषणाने रामाचा आश्रय घेतल्याचे उदाहरण देत नितीश कुमार यांना राष्ट्रीय जनता दलकडून सन्मान मिळत नसल्याचे म्हटले आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी भाष्य केले. यावेळी नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबाबत म्हणाले की, "जे काही घडत आहे ते चांगले आहे. राजकारणात हे सर्व घडत असते. नितीश कुमार यांना तिथे सन्मान मिळत नव्हता. जेव्हा रावणाचा भाऊ विभिषण रामाचा आश्रय घेऊ शकतो, तर मग नितीश कुमार आल्याने काय फरक पडतो."
#WATCH हाथरस, उत्तर प्रदेश: NDA में शामिल होने के बाद नीतीश कुमार के बिहार के सीएम पद की शपथ लेने पर जगद्गुरु रामभद्राचार्य ने कहा, "जो कुछ भी हो रहा है अच्छा है। राजनीति में ये सब होता रहता है। नीतीश कुमार को वहां सम्मान नहीं मिल रहा था....जब रावण का भाई विभीषण राम के शरण में आ… pic.twitter.com/4WB73KLBfP
— ANI_HindiNews (@AHindinews) January 28, 2024
नितीश कुमार मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक
नितीश कुमार एनडीए युतीत सामील झाल्यानंतर, आज म्हणजेच सोमवारी पहिली मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. नितीश कुमार यांच्या नवीन मंत्रिमंडळाची पहिली बैठक मंत्रिमंडळ कक्षात सकाळी 11.30 वाजता होणार आहे. बिहार विधानसभेचे अधिवेशन 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. याआधी नितीश मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
नितीश कुमार यांच्यासह 8 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. सध्या सर्व खाती मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडेच राहतील. मंत्रिमंडळाच्या संपूर्ण विस्तारानंतरच मंत्र्यांच्या खात्यांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. 9व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनल्यावर नितीश कुमार म्हणाले की, मला मुक्ती मिळाली, जिथे होते तिथे परत आलो. सोमवारी मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. तसेच, नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदनही केले.
कॅप्टनने इंडिया आघाडी सोडली - आचार्य प्रमोद कृष्णम
विरोधी आघाडी 'इंडिया'मध्ये नितीशकुमार संयोजकपदाच्या शर्यतीत पुढे होते. काँग्रेससह बहुतांश पक्षांना एकत्र आणण्याचे काम त्यांनी केले होते, मात्र त्यांना संयोजक करण्यात आले नाही. यामुळे नितीशकुमार नाराज झाल्याचे दिसून आले. तसेच, कोणत्याही पदाची इच्छा नसल्याचे त्यांनी अनेकदा सांगितले. मात्र असे असले तरी आता त्यांनी एनडीएसोबत हातमिळवणी केली आहे. नितीश कुमार एनडीएमध्ये सामील झाल्याबद्दल काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले की, कॅप्टन यांनी इंडिया आघाडी सोडली, हे आमच्यासाठी खूप दुःखद आहे.