इफ्तार पार्टीसाठी नितीशकुमार लालूंच्या घरी, तेजस्वी, तेजप्रताप यांनी केले स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 01:03 PM2022-04-23T13:03:18+5:302022-04-23T13:05:05+5:30
इफ्तार पार्टीच्या वेळी राबडीदेवी, मीसा भारती, राजश्री यादव, सय्यद शाहनवाज हुसेन, चिराग पासवान आदी उपस्थित होते.
एस. पी. सिन्हा -
पाटणा : राजदने आयोजित केलेल्या दावत-ए-इफ्तारमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार सहभागी झाले. चार वर्षांनी नितीशकुमार हे राबडीदेवींच्या घरी पायीपायीच यानिमित्ताने गेले. तेथे तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.
इफ्तार पार्टीच्या वेळी राबडीदेवी, मीसा भारती, राजश्री यादव, सय्यद शाहनवाज हुसेन, चिराग पासवान आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री नितीशकुमार हे यापूर्वी तेजप्रताप यादव यांच्या विवाह समारंभात सहभागी झाले होते. त्यानंतर आज त्यांनी राजदच्या इफ्तार पार्टीला हजेरी लावली. यावेळी तेजस्वी यादव यांच्या पत्नी राजश्री यादव यांनी नितीशकुमार यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले.
नितीशकुमार घरी आल्यामुळे लालूंच्या कुटुंबीयांना आनंद झाला. आजच लालूंना रांची हायकोर्टाने जामीन मंजूर केला. विशेष म्हणजे २०१५ मध्ये लालू-नितीश यांनी एकत्रितरीत्या राज्यातील निवडणुका लढविल्या होत्या. त्यावेळी नितीश यांच्या नेतृत्वात सरकार स्थापनही झाले होते. तेव्हा तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाले होते. तथापि, त्यानंतर नितीश यांनी भाजपशी युती केली.
तत्पूर्वी नितीशकुमार हे लालूंबरोबर दही खातानाची छायाचित्रे समोर आली होती. लालूंशी युती तोडून भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर नितीशकुमार हे राबडीदेवींच्या निवासस्थानी गेले नव्हते.
अमित शहांच्या दौऱ्याआधी...
- नितीशकुमार इफ्तार पार्टीच्या निमित्ताने लालू-राबडींच्या घरी गेले, याचे राजकीय अर्थही काढले जात आहेत.
- केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे दिग्गज नेते अमित शहा बऱ्याच कालावधीनंतर बिहारच्या दौऱ्यावर येत आहेत.
- त्यांच्या आगमनापूर्वी काही तास नितीशकुमार यांचे लालू-राबडींच्या घरी जाणे, चर्चेचा विषय बनले आहे.
- यावेळी तेजस्वी यादव यांनी लालूंना जामीन मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.