"नितीश कुमार यांनी विश्वासार्हता गमावली, राजीनामा दिला तर...", ममता बॅनर्जींचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 08:05 AM2024-01-27T08:05:16+5:302024-01-27T08:07:32+5:30
७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजभवनात एका कार्यक्रमादरम्यान ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
कोलकाता : बिहारच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार (Nitish Kumar) हे विरोधकांच्या इंडिया आघाडीतून बाहेर पडणार आणि राज्यात पुन्हा भाजपामध्ये सामील होणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी मोठे विधान केले आहे. त्या म्हणाल्या की, नितीशकुमार इंडिया आघाडीमधून बाहेर पडल्यानंतर आघाडीवर फारसा परिणाम होणार नाही.
७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजभवनात एका कार्यक्रमादरम्यान ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, "मला वाटते की नितीश कुमार यांनी बिहारच्या लोकांच्या नजरेत आपली विश्वासार्हता गमावली आहे. त्यांनी राजीनामा दिल्यास तेजस्वी यादव यांना बिहारमध्ये सुरळीतपणे काम करणे सोपे होईल." अलीकडेच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला पक्ष तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवेल, असे जाहीर केले होते. तसेच, प्रादेशिक पक्ष एकत्र राहतील आणि लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतरच भविष्यातील सर्व निर्णय घेतले जातील, असे त्या म्हणाल्या होत्या.
दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी केंद्र सरकारला विविध केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत पश्चिम बंगाल सरकारला केंद्रीय निधी न दिल्याबद्दल चेतावणी देणारी नोट जारी केली. सीएम ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'जोपर्यंत केंद्राचा निधी येत्या सात दिवसांत दिला जात नाही, तोपर्यंत या मुद्द्यावर आणखी आंदोलने केली जातील.' मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारद्वारे विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे राज्य सरकारने समाधानकारक दिल्यानंतर सुद्धा केंद्राचा निधी जारी झालेला नाही.
इंडिया आघाडीसाठी बजावली महत्त्वाची भूमिका
नितीश कुमार सध्या इंडिया आघाडीत आहेत. या आघाडीत विरोधी बाकावरील एकूण २८ घटक पक्ष आहेत. या विरोधकांना एकत्र आणण्यासाठी नितीश कुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा, शिवसेना (ठाकरे गट) अशा देशातील वेगवेगळ्या नेत्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे नितीश कुमार यांनी आता भाजपाशी हातमिळवणी केल्यास इंडिया आघाडीच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. नितीश कुमार यांच्या या निर्णयाचा बिहारमधील महाआघाडी, तसेच राष्ट्रीय पातळीवरील इंडिया आघाडीला मोठा फटका बसू शकतो.