नितीशकुमार बिहारमध्ये घडवणार राजकीय भूकंप?
By Admin | Published: July 11, 2017 01:36 AM2017-07-11T01:36:56+5:302017-07-11T01:36:56+5:30
राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल (यूनायटेड) यांच्यातील दरी वाढत असतानाच, उपमुख्यमंत्री तेजस्वीप्रसाद यादव राजीनामा देणार नाहीत, असे राजदने सोमवारी स्पष्ट केले
एस. पी. सिन्हा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणा : बिहारमधील राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल (यूनायटेड) यांच्यातील दरी वाढत असतानाच, उपमुख्यमंत्री तेजस्वीप्रसाद यादव राजीनामा देणार नाहीत, असे राजदने सोमवारी स्पष्ट केले. राजद आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला लालूप्रसाद यादव उपस्थित होते. मात्र छाप्यांपासून गप्प असलेले नितीशकुमार काही मोठा निर्णय घेऊन, बिहारच्या राजकारणात भूकंप घडवतील, अशी चर्चा सुरू आहे.
मोदी सरकारकडून बिहार सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप करून सिद्दिकी म्हणाले की, लालूप्रसाद व कुटुंबीयांच्या बदनामीचे प्रयत्न हा त्याचाच भाग आहे. देशभर घृणा, विद्वेष व उन्मादाचे वातावरण भाजप करीत असून, खोटे आरोप करून, विरोधकांंना अडचणीत आणण्याचा डाव सरकार खेळत आहे.
बैठकीला पाठ?
नितीशकुमार यांनी आमदारांची मंगळवारी बैठक बोलावली. त्यानंतर पक्ष उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत भूमिका जाहीर करेल. उपराष्ट्रपतीपदासाठीही विरोधकांच्या उमदेवाराऐवजी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवाराला
पाठिंबा देण्याच्या मन:स्थितीत असल्याचे कळते.
रेल्वेमंत्रीपदाच्या काळातील कथित घोटाळ्यात लालूप्रसाद यादव व त्यांच्या कुटुंबीयांची नावे आल्यानंतर, अटक टाळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न सुरू केले आहे. यादव यांनी ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांच्याशी संपर्क साधला आहे. अटकपूर्व जामिनासाठी सर्व जण अर्ज करण्याची शक्यता दिसत आहे.