नीतीश कुमार मुख्यमंत्रिपद सोडू शकतात; भाजपा नेत्याच्या विधानानं चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 03:53 PM2023-12-28T15:53:03+5:302023-12-28T15:53:51+5:30
सध्या जेडीयूत सर्वकाही आलबेल नाही. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांच्याबाबत विविध बातम्या समोर येत आहेत.
पटना - बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच नीतीश कुमार कधीही मुख्यमंत्रिपद सोडू शकतात असं विधान केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते गिरीराज सिंह यांनी केल्यानं खळबळ उडाली आहे. जेडीयूतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असताना अशावेळी भाजपा नेत्याने हे विधान केले आहे. दिल्लीत जेडीयू नेत्यांच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होणार आहे. त्यात सहभागी होण्यासाठी अनेक नेते दिल्लीत पोहचलेत. मुख्यमंत्री नीतीश कुमार हेदेखील राजधानीत पोहचले आहेत.
सध्या जेडीयूत सर्वकाही आलबेल नाही. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांच्याबाबत विविध बातम्या समोर येत आहेत. त्यात भाजपाचे दिग्गज नेते गिरीराज सिंह यांनी म्हटलं की, नीतीश कुमार हे मुख्यमंत्रिपद सोडू शकतात. त्यांच्याकडे २ पर्याय आहेत. एकतर पक्षाचे विलीनीकरण करणे किंवा मुख्यमंत्रिपद सोडणे.पण बिहारचे मुख्यमंत्रिपद ते सोडतील हे २०० टक्के निश्चित झाले आहे. ललन सिंह यांच्यावर नितीश कुमार नाराज आहेत. त्यामुळे त्यांना पक्षातील पद सोडण्यास सांगितले जाऊ शकते.
तसेच लालू यादव आणि नीतीश कुमार यांच्याबाबतही त्यांनी भाष्य केले. लालू यादव मुख्य रणनीतीकार आहेत. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी ते काहीही करतील. विधानसभा अध्यक्ष राजदचा आहे ते महत्त्वाची भूमिका पार पाडतील. विधानसभा अध्यक्ष खेळ करतील. नीतीश कुमारांनी जॉर्ज फर्नांडिस, शरद यादव यांनाही सोडले नाही. ललन सिंह यांनाही हटवले तर कुठली मोठी गोष्ट आहे. आतापर्यंत पक्षाच्या ३ राष्ट्रीय अध्यक्षांना हटवण्याचं काम नीतीश कुमार यांनी केले आहे असंही गिरीराज सिंह यांनी म्हटलं.