Nitish Kumar: नितीश कुमार मुख्यमंत्रिपद सोडणार, राज्यसभेत जाणार? अखेर जेडीयूनं केलं स्पष्ट, दिले असे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 01:17 PM2022-04-01T13:17:19+5:302022-04-01T13:18:04+5:30
Nitish Kumar News: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे मुख्यमंत्रिपद सोडून राज्यसभेवर जाण्याच्या विचारात असल्याची चर्चा सुरू आहे. त्यानंतर भाजपा बिहारमधून नितशी कुमार यांची उचलबांगडी करून राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री बसवण्याच्या तयारीत असल्याचे दावे केले जात आहेत.
पाटणा - बिहारचेमुख्यमंत्रीनितीश कुमार हे मुख्यमंत्रिपद सोडून राज्यसभेवर जाण्याच्या विचारात असल्याची चर्चा सुरू आहे. त्यानंतर भाजपा बिहारमधून नितशी कुमार यांची उचलबांगडी करून राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री बसवण्याच्या तयारीत असल्याचे दावे केले जात होते. मात्र आता याबाबत नितीश कुमारांच्या संयुक्त जनता दल पक्षानं स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच ही चर्चा म्हणजे केवळ अफवा असल्याचे सांगितले आहे.
बिहार सरकारमधील मंत्री आणि जेडीयूचे नेते संजय कुमार झा यांनी ही चर्चा म्हणजे केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, मला नितीश कुमार राज्यसभेवर जायचा विचार करत आहेत या अफवेबाबत ऐकून धक्काच बसला आहे. ही कुणीतरी खोडसाळपणे पसरवलेली अफवा आहे. तसेच वास्तवापासून खूप दूर आहे. नितीश कुमार यांच्याकडे बिहारची सेवा करण्याचा जनादेश आहे. तसेच ते संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करतील. ते कुठेही जाणार नाहीत.
संजय कुमार झा यांनी पुढे सांगितले की, नितीश कुमार २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएचा चेहरा होते. मतदारांनी या आघाडीला मतदान केले होते. तसेच लोकांची सेवा करण्याची त्यांची कटिबद्धता आणि बिहारला बदण्याची क्षमता पवित्र आहे. मी सर्वांना या प्रकारच्या अशा प्रकारच्या दुष्प्रचारापासून दूर राहण्याचा आग्रह करतो. त्यामुळे खूप कमी लाभ होईल.
दरम्यान, नितीश कुमार यांनी हल्लीच एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज्यसभेत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यात ते म्हणाले होते की, ते तीन सभागृहांचे सदस्य राहिलेले आहेत. आता केवळ राज्यसभेचे सदस्य होणे बाकी आहे. आता कधी ना कधी राज्यसभेत जाण्याची आपली इच्छा आहे. तेव्हापासूनच भाजपा नितीश कुमार यांना राज्यसभेत पाठवू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या बिहारचे मुख्यमंत्री असलेले नितीश कुमार हे बिहार विधान परिषद, बिहार विधानसभा आणि लोकसभेचे सदस्य राहिलेले आहेत. मात्र त्यांनी आतापर्यंत राज्यसभेचं प्रतिनिधित्व केलेलं नाही. जवळपास १६ वर्षे बिहारचे मुख्यमंत्रिपद सांभाळणाऱ्या नितीश कुमार यांच्या या इच्छेमुळे ते आता कुठल्यातरी नव्या भूमिकेत दिसण्याचे संकेत मिळत आहेत.