महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची नितीशकुमारांना ऑफर?; BJP-JDU त समझोत्याच्या हालचाली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 09:27 AM2023-09-18T09:27:24+5:302023-09-18T09:28:14+5:30
भविष्य व राज्याचा विकास पाहून सरकार स्थापन केले जातात. याबाबत पक्ष अंतिम निर्णय घेणार आहे असं JDU नेत्याने सांगितले.
विभाष झा
पाटणा : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप बिहारमध्ये मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे. भाजपची ही खेळी यशस्वी झाली, तर मुख्यमंत्री नितीशकुमार पुन्हा एकदा एनडीएमध्ये सहभागी होऊ शकतात. फक्त यासाठी नितीशकुमार यांना भाजपची ऑफर मान्य करावी लागेल.
राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीचे निकाल भाजपच्या बाजूने गेल्यास नवीन सरकारच्या स्थापनेत जदयूला महत्त्व मिळण्याची चर्चा आहे. म्हणजेच जदयूच्या कोट्यातून ३ केंद्रीय मंत्री व १ राज्यमंत्री बनवण्यात येण्याची शक्यता आहे.
अट एवढीच राहणार आहे की, बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार देण्यात यावा. राज्यात एनडीएचे सरकार आले तर जदयूच्या कोट्यातून उपमुख्यमंत्री व अन्य मंत्री केले जाण्याची शक्यता आहे, अशीही चर्चा सुरू आहे. यावर विचारविनिमय सुरू आहे. यावर अद्याप अंतिम सहमती झालेली नाही.
जदयूच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, येथे कोणी कोणाचा कायमचा शत्रू नाही. भविष्य व राज्याचा विकास पाहून सरकार स्थापन केले जातात. याबाबत पक्ष अंतिम निर्णय घेणार आहे. पक्षात मतैक्य झाले तर पुढील विधानसभा निवडणूक भाजपबरोबर लढणार आहोत. याबाबत पक्षश्रेष्ठींच्या निर्देशानुसार पुढील रणनीतीवर काम केले जाईल.
कशी सुरू आहे चर्चा
सूत्रांनी सांगितले की, भाजपने नितीशकुमार यांना यापूर्वीही महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची ऑफर दिलेली होती; परंतु त्यावेळी नितीशकुमार राष्ट्रपतिपद किंवा उपराष्ट्रपतिपदावर अडून बसले होते. त्यावेळी चर्चा यशस्वी झाली नव्हती. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून राज्यसभेचे उपसभापती हरिवंश व माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यामार्फत भाजपची नितीशकुमार यांच्याशी चर्चा सुरू आहे, असे समजते. नितीशकुमार यांनी अलीकडेच राजभवनात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती.
अमित शाह यांचे इंडिया आघाडीवर टीकास्त्र
१६ सप्टेंबर रोजी बिहारच्या झंझारपूर लोकसभा मतदारसंघातील एका जाहीर सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजद प्रमुख लालूप्रसाद यादव व इंडिया आघाडीवर टीका केली होती. भाषणातून अमित शाह हे नितीशकुमार यांना केवळ सल्ला देताना दिसले. त्यांनी नितीशकुमार यांच्यावर कोणताही गंभीर आरोप केला नाही. नितीशकुमार यांच्यासाठी भाजपची दारे बंद आहेत, असेही म्हटलेले नाही. फक्त एवढेच म्हणाले होते की, २०२४ मध्ये पंतप्रधानपद रिक्त नाही.