नितीश कुमारांना पुन्हा आठवली भाजपासोबतची मैत्री, त्या विधानाने सारेच अवाक्, तर्कवितर्कांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 04:17 PM2023-10-19T16:17:35+5:302023-10-19T16:18:14+5:30
Nitish Kumar: नितीश कुमार यांनी आज बिहारमधील एका कार्यक्रमात भाजपाबाबत केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांचा बाजार गरम झाला आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे त्यांच्या राजकीय भूमिकांसाठी नेहमीच चर्चेत राहिलेले आहे. कधी भाजपाशी मैत्री तर कधी लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाशी दोस्ती असे डाव खेळत गेल्या अनेक वर्षांपासून बिहारचं मुख्यमंत्रिपद आपल्याकडे ठेवण्यात ते यशस्वी ठरले आहेत. दरम्यान, नितीश कुमार यांनी आज बिहारमधील एका कार्यक्रमात भाजपाबाबत केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांचा बाजार गरम झाला असून, तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. जोपर्यंत जिवंत राहीन, तोपर्यंत तुमच्यासोबत माझा संबंध राहील. चिंता करू नका सर्वजण मिळून काम करू, असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे.
नितीश कुमार यांनी हे वक्तव्य मोतिहारी केंद्रीय विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत सोहळ्याला संबोधित करताना केलं आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या सोहळ्याला राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू या उपस्थित होत्या. त्यांच्यासमोरच भाजपाच्या नेत्यांकडे इशारा करत नितीश कुमार यांनी भाजपा नेत्यांसोबतचे संबध हे जीवनभर कायम राहतील, असे सांगितले. तसेच यावेळी नितीश कुमार यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या कामाचं कौतुक करत सरकारचे आभार मानले. तर आधी सत्तेवर असलेल्या मनमोहन सिंग सरकारवर टीका केली. आता बिहारसह देशाच्या राजकीय वर्तुळात नितीश कुमार यांच्या विधानांनंतर खळबळ उडाली असून, त्यांच्या वक्तव्यांचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
यावेळी नितीश कुमार यांनी आधीच्या कालखंडांतील घटनांचाही उल्लेख केला. तत्कालीन मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं माझं म्हणणं ऐकलं नाही. २०१४ मझ्ये देशात नवं सरकार सत्तेत आलं. तेव्हा त्यांनी माझं म्हणणं ऐकलं. केंद्रातील मनमोहन सिंग सरकारने २००७ मध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटी उघडण्याची घोषणा केली होती. २००९ मध्ये यूपीए-२ सरकारने केंद्रीय विद्यापीठ कायदा पारित केला. त्यानुसार बिहारमध्ये विद्यापीठ उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचवेळी मी मोतिहारीमध्ये केंद्रीय विद्यापीठ सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र वारंवार मागणी केल्यानंतरही केंद्र सरकारने त्यााल नकार दिला. या मागणीसाठी मी शिक्षण मंत्र्यांनाही भेटलो होतो. त्यांनीही मला खाऊपिऊ घातलं मात्र मात्र विद्यापीठ सुरू करण्यास नकार दिला.