Nitish Kumar : 2014 मध्ये सत्तेवर आलेले 2024 मध्ये राहतील की नाही?; नितीश कुमारांचा मोदी सरकारवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 10:41 AM2022-08-11T10:41:42+5:302022-08-11T11:09:28+5:30
Nitish Kumar And BJP, Narendra Modi : सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांत स्वत:च्या भविष्याबद्दल चिंता करणे आवश्यक आहे, असा इशाराही नितीश कुमार यांनी दिला.
नवी दिल्ली - भाजपशी दुसऱ्यांदा काडीमोड घेतलेल्या नितीश कुमार यांनी आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून बुधवारी शपथ घेतली, तर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचाही शपथविधी पार पडला. सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांत स्वत:च्या भविष्याबद्दल चिंता करणे आवश्यक आहे, असा इशाराही नितीश कुमार यांनी दिला. नितीश कुमार यांनी शपथविधीनंतर भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "राजद व अन्य घटक पक्षांबरोबर आम्ही बिहारमध्ये स्थापन केलेले नवीन सरकार आपला कालावधी पूर्ण करणार नाही हा भाजपचा पोकळ दावा आहे. 2014 साली केंद्रात सत्तेवर आलेले भाजपाचे सरकार 2024 साली पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता कमी आहे" असं म्हटलं आहे.
नितीश कुमार यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकांत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहनही केले आहे. नितीश कुमार यांनी राज्यात नवं सरकार स्थापन केल्यानंतर 2024 मध्ये ते मोदींच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याची देखील जोरदार चर्चा रंगली होती. मात्र यानंतर त्यांनीच आता मोठं विधान केलं आहे. पंतप्रधान पदाच्या उमेदवारीमध्ये आपल्याला रस नसल्याचं नितीश कुमार यांनी म्हटलं. शपथ घेतल्यानंतर त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
He won in 2014, but should now worry about 2024: Bihar CM Nitish Kumar about PM Narendra Modi
— Press Trust of India (@PTI_News) August 10, 2022
"निवडणूक काळात भाजपाचं वागणं योग्य नव्हतं. आमच्या लोकांनी त्यांना पाठिंबा दिला. पण त्यांच्याकडून जदयूला हरवण्यासाठीच प्रयत्न केले गेले. मी आमच्या पक्षातील सर्वांशी चर्चा केली. सर्वांच्याच मनात या आघाडीत राहायला नको हीच भावना होती. म्हणून भाजपाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला" असं देखील नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. राजभवनामध्ये झालेल्या समारंभात नितीशकुमार यांना राज्यपाल फागू चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाची व गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेजस्वी यादव यांनी शपथ घेतल्यानंतर नितीशकुमार यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले.
नितीशकुमार यांनी सरकारचे बहुमत सिद्ध केल्यानंतर मंत्रिमंडळाची स्थापना केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. भाजपचे ७७ सदस्य असून, तो दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष आहे. भाजपचा एकही नेता नितीशकुमार यांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहिला नाही. सोहळ्याचे आम्हाला निमंत्रण मिळाले नसल्याचा दावा बिहारचे माजी उपमुख्यमंत्री व भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी केला होता. नितीशकुमार, तेजस्वी यादव यांच्या शपथविधी सोहळ्याला लालूप्रसाद यादव प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत; पण त्यांच्या पत्नी राबडीदेवी आवर्जून उपस्थित होत्या.