नितीशकुमारांनी भाजपासमोर खाते वाटपाचा फॉर्म्युला ठेवला? टीडीपीची मागणी मोदी मान्य करणार का...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 11:11 AM2024-06-06T11:11:07+5:302024-06-06T11:12:15+5:30
आधीच्या दोन टर्ममध्ये भाजपाच बहुमतात असल्याने ते देतील ती मंत्रिपदे घेतल्याशिवाय मित्रपक्षांना गत्यंतर नव्हते. आता दिवस बदलले आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहेत. एनडीएची तयारी सुरु झाली आहे. अशातच किंगमेकर ठरलेल्या नितीशकुमार यांनी व इतर घटक पक्षांनी भाजपाला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. आधीच्या दोन टर्ममध्ये भाजपाच बहुमतात असल्याने ते देतील ती मंत्रिपदे घेतल्याशिवाय मित्रपक्षांना गत्यंतर नव्हते. आता दिवस बदलले आहेत. आता मित्रपक्ष म्हणतील ते मंत्रिपद सत्तेत राहण्यासाठी द्यावे लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीत २९३ जागा जिंकणाऱ्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) नेतेपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली. दिल्लीत बुधवारी झालेल्या या बैठकीत तेलुगू देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू व संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांच्यासह सर्व घटकपक्षांच्या नेत्यांनी एनडीएला समर्थन देत असल्याचे पत्र सादर केले. त्यामुळे निकालानंतर चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांच्या राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
आता सत्तेत मोठा वाटा मिळेपर्यंत नितीशकुमार दिल्लीतर तळ ठोकून असणार आहेत. सुत्रांनुसार नितीशकुमार यांनी मंत्रिपदांच्या वाटणीसाठी एक फॉर्म्युला भाजपसमोर ठेवला आहे. यानुसार चार खासदारांमागे एक कॅबिनेट मंत्रिपद दिले जावे. यानुसार जेडीयूचे १२ खासदार आहेत मग नितीशकुमारांना तीन कॅबिनेट मंत्रिपदे हवी आहेत.
दुसरीकडे चंद्राबाबू नायडूंची टीडीपीने देखील खलबते सुरु केली आहेत. त्यांचे १६ खासदार आहेत. यामुळे टीडीपी लोकसभा अध्यक्षपद, रस्ते वाहतूक, ग्रामीण विकास, आरोग्य, कृषी, शिक्षण आणि अर्थखाते मागण्याची शक्यता आहे. भाजपाला बहुमताचा आकडा पार करता न आल्याने आता या दोघांच्या मागण्यांवर तोडपाणी करावे लागणार आहे.
शुक्रवारी राष्ट्रपतींकडे दावा; शनिवारी शपथविधी?
एनडीएच्या सर्व खासदारांची शुक्रवार, ७ जून रोजी दुपारी २ वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात येईल. तत्पूर्वी सकाळी ११ वाजता भाजप संसदीय पक्षाची बैठक होऊन त्यामध्ये नरेंद्र मोदी यांची भाजपच्या नेतेपदी निवड केली जाईल. या बैठकीनंतर एनडीएचे सर्व प्रमुख नेते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ स्थापनेचा दावा करणार आहेत. त्यानंतर शनिवारी, ८ जून रोजी नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तविली आहे.